मुंबई पालिकेच्या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

 

मुंबई: मिठी नदीवर फ्लड गेट लावण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. वरळीतील फ्लड गेट काढण्यात आलेले असताना मिठी नदीवर फ्लड गेट कशासाठी?, इतर ठिकाणी लावलेल्या फ्लड गेटचा काय फायदा झाला? असे सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar demand to probe SIT enquiry of bmc’s flood gate scam)

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत पालिकेवर फ्लड गेट घोटाळ्याचा आरोप करत ही मागणी केली. मिठी नदीवर फ्लड गेट लावण्यात येणार आहे. 185 ठिकाणी हे फ्लड गेट लावणार आहेत. मिठी नदीला फ्लड गेट लावणार आहात तर वरळीचे फ्लड गेट का काढले? इतर ठिकाणी लावलेल्या फ्लड गेटचा काय फायदा झाला? हा पालिकेचा नवा फ्लड गेट फ्रॉड आहे. मुख्यमंत्री संवेदनशीलपणे काम करत असतील. पण पालिकेत काय चाललं आहे? मुख्यमंत्र्यांनी एसआयटी मार्फत या फ्लड गेट घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

नरबळीचा प्रस्ताव आणणार का?

एवढे सगळे अधिकारी असताना मुंबईत दुर्घटना झाल्याच कशा? असा सवाल करतानाच दुर्घटना झाल्यानंतर पालिकेत प्रस्ताव होतो. आता नरबळी घेत्यावर विकासाचे प्रस्ताव करणार आहात का?; असा संतप्त सवाल त्यांनी केला.

फ्लड वॉर्निंग सिस्टिम फक्त कलानगरसाठीच

यावेळी त्यांनी पालिकेच्या फ्लड वॉर्निंग सिस्टिमवरही टीका केली. फ्लड वॉर्निंग सिस्टिम केवळ कलानगरसाठीच आहे. कलानगरला फ्लड वॉर्निंग आणि बाहेर फ्लड बेरिंग. कलानगरात खूप पंप लावले आहेत. शिवसेनेचे हेच धंदे आहेत, अशी टीका त्यांनी केली.

31 बळींना जबाबदार कोण?

राजकारण करायचा मुद्दा नाही. लोककारण करावं लागेल. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने 112 टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही 31 लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात आणून ठेवायचं आहे. सेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली. (ashish shelar demand to probe SIT enquiry of bmc’s flood gate scam)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area