औरंगाबाद : आईसमोर शिवीगाळ केल्याने तरुणाचा संताप अनाावर; मित्राची भररस्त्यात चाकू भोकसून हत्या

 

एक दिवस अगोदर आईसमोर शिवीगाळ केल्याचा राग आल्याने संतापलेल्या सराईत गुन्हेगाराने मित्राला भरचौकात चाकूने भोसकले. ही थरारक घटना गुरुवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास संजयनगरातील गल्ली क्र. सी-७ च्या कॉर्नरवर घडली. या घटनेमुळे संजयनगर भागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत संशयित आरोपी शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्या शेख अहेमद ( वय २४, रा. गौसिया मस्जिदजवळ, कैलासनगर) याला तातडीने अटक केली. मंगेश दिनकर मालोदे (वय २८, रा. संजयनगर, गल्ली क्र. ७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संजयनगरातील मंगेश गरवारे कंपनीत हमाली करायचा. याच परिसरातील शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्याशी त्याची मैत्री होती. मात्र, २१ जुलै रोजी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर भुऱ्याने गुरुवारी मंगेश व त्याच्या वडिलांची माफी मागितली. त्यानंतर दोघांचे पुन्हा सुरुवातीसारखे मैत्रीसंबंध झाले. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मंगेश, गल्लीच्या चौकातील ओट्यावर बसलेला असताना भुऱ्या त्याच्या आईसोबत तेथे आला. तेव्हा दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी रागाच्या भरात मंगेशने भुऱ्याला त्याच्या आईसमोर शिवीगाळ करत सुनावले. त्यामुळे संतप्त झालेल्या भुऱ्याने चाकूने मंगेशच्या डाव्या हातावर आणि डाव्या पायाच्या पोटरीवर दोन वार केले. त्यामुळे मंगेश रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. तर भुऱ्याने तेथून पळ काढला. नागरिकांनी धाव घेत जखमी मंगेश यास घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी बोलावण्यात आले. पथकाने घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. ही प्रक्रिया सुरु असतानाच संशयित आरोपी भुऱ्याबाबत माहिती मिळाल्यावरुन पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर व त्यांच्या पथकाने सापळा रचत भुऱ्याला जेरबंद केले. दरम्यान, पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.

दरम्यान, या प्रकरणी मंगेशचा थोरला भाऊ उमेश याच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेश मयेकर करीत आहेत.

भुऱ्या सराईत गुन्हेगार

भुऱ्यावर हाणामारी, लुटमारीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्याला गांजा आणि दारू पिण्याच्या सवयी असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आरोपी शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्या यास शुक्रवारी कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area