पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून लुटले; टोळीच्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या

 

खुलताबाद : बँकेत पैसे जमा करण्यासाठी निघालेल्या श्रीराम पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून त्यांच्याकडील पाच लाख ३४ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीला खुलताबाद पोलिसांनी ४८ तासांत अटक केली आहे. १९ जुलै रोजी दुपारी ही घटना घडली होती.

प्रकाश कल्याण चुंगडे (वय २१, रा. खापरखेडा, ता. कन्नड), महेंद्र रामदास साळुंके (वय २१, रा. मनूर ता. वैजापूर), नितीन घाशीराम राजपूत (वय २१, रा. खापरखेडा, ता. कन्नड) आणि अर्जुन मिठ्ठू ताटू (रा. रूपवाडी, ता. कन्नड) अशी खुलताबाद पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेरूळ येथील श्रीराम पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक अशोक गोपीनाथ काकडे हे दुपारी दोनच्या सुमारास पाच लाख ३४ हजारांची रक्कम दुचाकीवरून वेरूळला बँकेत भरण्यासाठी जात होते. वेरूळ उड्डाणपुलाजवळून जात असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्याकडील पाच लाख ३४ हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. याबाबत पेट्रोल पंपाचे मालक विजय बोडखे यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी आरोपींच्या वर्णनावरून पूर्वी पेट्रोल पंपावर काम करणारा व कामावरून कमी केलेला प्रकाश चुंगडे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणइ इतर साथीदारांची नावे सांगितली. यानुसार पोलिसांनी त्वरित इतर तिघांना अटक केली. सर्व आरोपींनी न्यायालयात हजर केले असता २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून तीन लाख अकरा हजार ६७० रुपये रोख, तीन मोबाइल आणि दोन दुचाकी असा एकूण तीन लाख ८६ हजार ६७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. खुलताबाद पोलिस या प्रकरणी आणखी एका फरारी आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, हेड कॉन्स्टेबल नवनाथ कोल्हे, पोलिस नाइक यतीन कुलकर्णी, भगवान चरवंडे, कारभारी गवळी, सुहास डबीर, कृष्णा शिंदे, रूपाली सोनवणे, रामदास दिवेकर, प्रमोद गरड यांच्या पथकाने कारवाई केली.

आरोपींना ४८ तासांत अटक केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पथकाचे अभिनंदन करून दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area