कोल्हापुरात सहकाराचा नवा हात ; 'आण्णासाहेब पाटील' कर्ज योजनेसाठी बँका एकवटल्या

कोल्हापूर : तरूणांना उद्योग क्षेत्रात भरारी मारता यावी, त्यांना सुलभपणे कर्ज पुरवठा व्हाव यासाठी राज्य सरकारने आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी स्थापना केली, मात्र त्याचा व्यवस्थित पाठपुरावा आणि समन्वय नसल्याने गरजू युवकांना फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर कोल्हापुरातील सहकारी बँकांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. बावीसपेक्षा अधिक बँका यासाठी एकत्रित आल्या असून त्यांनी समन्वय कक्षच स्थापन केला आहे. लवकरच याचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे.

मराठा समाजातील युवकांना राज्य सरकार आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून देते. हे कर्ज इच्छूक तरूणांना मिळण्यात अनेक अडचणी येतात. काही बँका अशा प्रकारचे कर्ज देण्यात टाळाटाळ करतात. यामुळे राज्य सरकारचा मूळ हेतू साध्य होण्यात अडथळे येतात. म्हणून योजना चांगली असूनही युवकांना त्याचा फायदा होत नाही. हे लक्षात आल्यानंतर सर्व सहकारी बँकांना एकत्र आणून युवकांना मदतीचा हात देण्याचा संकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी मांडलेली संकल्पना सर्वांना पटली. त्यातून या सर्व बँका युवकांच्या मदतीसाठी पुढे येण्यास तयार झाल्या.

युवकांना या योजनेतून कर्ज मिळण्यात अडथळा येऊ नये यासाठी सर्व बँकांची एकाच ठिकाणी समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत ‘ आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व इतर व्यवसाय कर्ज योजना समन्वय कक्ष’ या नावाने हे कक्ष स्थापन केले आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते झाले. सारथी व सहकारी बँकांचे क्लस्टर यांनी एकत्रितपणे कौशल्य विकास प्रशिक्षणासह कर्ज वाटपाचे काम यशस्वीपणे राबवले तर राज्यात रोजगार निर्मितीचा इतिहास घडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या तरूणांनी या केंद्राशी संपर्क साधल्यास सर्व प्रक्रिया येथूनच केली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्या जिल्हा पातळीवर असणारे हे केंद्र लवकरच राज्य पातळीवरही सुरू करण्यात येणार आहे. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके,दिलीप पाटील, महेश धर्माधिकारी, एम. पी. पाटील, नंदकुमार माळकर,राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area