मुंबई : ईदच्या निमित्ताने दबंग स्टार सलमान खानने (Salman Khan) आपल्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज आणले आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या नवीन प्रोमोची घोषणा करुन सलमानने यावेळी आपल्या चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. भारतील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस आता ओटीटीवर येणार असून, आता त्याचा प्रोमो लाँच करण्यात आला आहे. व्हूटने नुकताच बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर जाहीर केला आहे. 8 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या रिअॅलिटी शोचे पहिले सहा आठवडे चाहत्यांसाठी चोवीस तास ऑनलाईन स्ट्रीम केले जातील.
सलमान खानने स्पर्धकांना दिला सल्ला
‘बिग बॉस ओटीटी’ पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्ट्रीम करण्याविषयी बोलताना सलमान खान म्हणतो की, “हे चांगले आहे की टीव्हीच्या 6 आठवड्यांपूर्वी व्हूटवर हा सीझन डिजिटल पद्धतीने स्ट्रीम होईल. ओटीटीवर 24 तास स्ट्रीम होणारा हा शो प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच करणार नाही, तर त्यांना या संपूर्ण प्रवासाचा भाग बनवण्यास देखील सक्षम असेल. सर्व स्पर्धकांना माझा सल्ला आहे की, बीबी हाऊसमध्ये सक्रिय रहा आणि मजा करा.”
शोमध्ये सामान्य लोकांना संधी मिळेल
व्हूटवर धमाका आणणाऱ्या या रिअॅलिटी शोमध्ये सामान्य लोकांना तसेच सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यक्तींना, काही कलाकारांना नशीब आजमावण्याची संधी मिळणार आहे. जर, हे स्पर्धक प्रेक्षकांना प्रभावित करू शकले, तरच हे पुढे जाऊ शकतील. असे म्हटले जात आहे की, यापैकी अंतिम फेरीतील 4 जणांना बिग बॉसच्या मुख्य घरात प्रवेश करण्याची संधी दिली जाईल.