विवाहित शेजारणीसोबत तरुण पळून गेला, महिलेच्या कुटुंबीयांनी भावाची हत्या करुन नदीत फेकलं

 

पाटणा : विवाहित शेजारणीसोबत पळून जाणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित युवकाचं आधी अपहरण केलं, त्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह नदीत फेकला. बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

18 जुलैला अपहरण झालेल्या एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना बागमती नदीमध्ये सापडला. या युवकाचा मोठा भाऊ राहुल कुमारने प्रेम प्रकरणातून विवाहित शेजारणीला पळवून नेल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. या घटनेनंतर दोन कुटुंबांमध्ये वाद झडत असल्याचंही पोलिसांना समजलं.

नेमकं काय घडलं?

विवाहितेचे कुटुंबीय वारंवार तरुणाच्या कुटुंबीयांना धमकावत होते. या काळात त्यांना बेदम मारहाणही केली गेली होती. 18 जुलैला महिलेच्या कुटुंबीयांनी राहुल कुमारचा धाकटा भाऊ गौतम कुमारचं अपहरण केलं होतं. गौतम आपल्या आत्याकडे जाण्यासाठी निघाला होता. मात्र तो ना तिथे पोहोचला, ना घरी परतला. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्याची बाईक सापडली. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

नदीत युवकाचा मृतदेह आढळला

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. 22 जुलैला कौरा गावाजवळून वाहणाऱ्या बागमती नदीमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळल्याचं पोलिसांना समजलं. त्याची ओळख पटवली असता तो गौतम कुमारच असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. गौतमच्या कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.

आपल्या सूनेसोबत राहुल कुमार पळून गेल्याच्या रागातून आरोपींनी त्याच्या भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व जण फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area