नवी मुंबईतील नगरसेविकेचे पती संदीप म्हात्रेंवर गुन्हा, हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मारहाणीचा आरोप

 


 नवी मुंबईतील : भाजप नेते गणेश नाईक यांचे खंदे समर्थक आणि नवी मुंबईतील नगरसेविकेचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. निवडणुकीदरम्यान प्रचारकामाचे पैसे थकवल्याने म्हात्रेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 6 भागातील संदीप म्हात्रे यांच्या कार्यालयातच त्यांच्यावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. मात्र हल्ल्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांनाच जबर मारहाण केल्याप्रकरणी म्हात्रेंवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नवी मुंबईतील माजी नगरसेविका संगीता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे रविवारी कोपरखैरणेतील आपल्या कार्यालयात होते. त्यावेळी मयुर लकडे आणि हृषिकेष जयभाय हे त्या ठिकाणी आले. मयुरने त्याच्याकडील कोयत्याने आपल्यावर वार केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला होता. त्यानंतर म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली असता हृषिकेषने त्या ठिकाणावरुन पळ काढला होता. परंतु मयुर हाती लागल्याने त्याला जबर मारहाण झाली होती. त्यानंतर म्हात्रे यांच्या समर्थकांनी पळालेल्या हृषिकेषचा शोध घेऊन त्यालाही जबर मारहाण केली होती. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत, तर म्हात्रेंनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.


दरम्यान, मयुर आणि हृषिकेष यांच्यासोबतच संदीप म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरने महापालिका निवडणुकीत म्हात्रे यांचे प्रचारकाम सांभाळले होते. यासाठी त्याला पाच लाख रुपयांचा मोबदला ठरला होता. परंतु निवडणूक झाल्यानंतरही म्हात्रे यांनी ठरलेला मोबदला देण्यास नकार दिल्याने त्यावेळीही आपण त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली होती, याची कबुली मयुरने दिली आहे. सध्या पैशांची गरज असल्याने रविवारी पुन्हा मयुर हा त्यांच्या कार्यालयात गेला होता. मात्र त्यावेळी दोघेही मद्यपान करुन बेधुंद अवस्थेत होते. परंतु आपल्या हातात कोयता बघताच म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मयुरने केला आहे. यासंदर्भात संदीप म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता, तो झाला नाही.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area