नवी मुंबई : व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची फसवणूक; 'तो' भाजीव्यापारी गाळा विकून गायब

 

नाशिक येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी बाजारातील एका भाजीव्यापाऱ्याला पाच लाख रुपयांचा शेतमाल पाठवला होता. मात्र त्याला पैसे न देताच व्यापारी तिथून गायब झाला आहे. आता स्वत:च्या घामाचे पैसे मिळावेत म्हणून शेतकरी बाजार समितीमध्ये नाशिक ते मुंबई अशा फेऱ्या मारत असून हे पैसे कधी मिळणार, याची आस त्याच्या डोळ्यांना लागून राहिली आहे.

सोमनाथ गणपत सानप असे या ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील वडगाव पिंगळा येथील ते रहिवासी आहेत. त्यांनी मुंबई घाऊक भाजीपाला मार्केटमधील ई विंगमधील गाळा क्रमांक ८३६ येथे दोन वर्षांपूर्वी कोबी पाठविले होते. या कृषिमालाचे पाच लाख ७५ हजार रुपये बिल झाले, मात्र त्यातील एकही पैसा अद्याप त्यांना मिळालेला नाही. या ठिकाणी एसएसके अँड कंपनी नावाने व्यापार करणारा व्यापारी मधुकर सुदाम डावखर याने त्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मालाच्या बदल्यात मे २०१९मध्ये दोन लाख रुपयांचा चेक या व्यापाऱ्याने दिला होता. तो सुद्धा वटला न गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आपल्या मेहनतीचे पैसे मिळण्यासाठी ते बाजार समितीत फेऱ्या मारत आहेत. मात्र दोन वर्षे नाशिक ते मुंबई फेऱ्या मारूनही त्यांच्या हातात काहीच लागले नाही.


याबाबत त्यांनी डिसेंबर २०१९मध्ये बाजार समिती अध्यक्ष आणि सचिवांना अर्ज केला होता. या अर्जावर बाजार समिती प्रशासनाने २९ जून २०२१मध्ये येथे दाखल त्यांच्या प्रकरणावर सुनावणीसाठी त्यांना पत्र पाठवले. त्यानुसार, १२ जुलै रोजी शेतमालाच्या गाडीत रात्री बसून शेतकरी सानप पहाटे भाजीपाला मार्केटमध्ये पोहोचले. तर, सुनावणीची वेळ सकाळी ११ वाजताची होती. त्यामुळे सुनावणीची वेळ येईपर्यंत ते बाजारात उपाशीपोटी बसून राहिले होते. काही व्यापाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी त्यांना चहा, नाष्टा दिला. मात्र इतके करूनही सुनावणी झालीच नाही. कारण कोणताच व्यापारी या सुनावणीला हजर राहिला नाही. ज्या व्यापाऱ्याने माल मागवला होता, तो व्यापारी गाळा विकून बाजारातून गाशा गुंडाळून फरार झाला आहे. तसेच, ज्याने हा गाळा विकत घेतला आहे, त्यावर आता ही जबाबदारी आली आहे. ज्या व्यापाऱ्याने गाळा विकत घेतला आहे, त्याला गाळा हस्तांतरणासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाही. मात्र बाजार समितीच्या वतीने यावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area