इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, तरुणावर लग्नासाठी दबाव, युवती ब्लॅकमेल करत महाराष्ट्रातून राजस्थानला


 जयपूर : इन्स्टाग्रामवर झालेली मैत्री आणि पैशांचा व्यवहार मुंबईत नोकरी करणाऱ्या मूळ राजस्थानच्या युवकाला चांगलाच महागात पडला. तरुणीने लग्नासाठी दबाव आणत तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील तरुणीने थेट तरुणाचं राजस्थानातील गाव गाठत त्याला आत्महत्येची धमकीही  दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे तक्रारदार तरुणाच्या भावानेही तिला साथ दिल्याचा दावा केला जात आहे. तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. (Instagram Friend blackmails man for wedding demands money after blackmail)

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील जसवंतपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत पंचौरी गावातील हे प्रकरण आहे. भीमाराम सुतार नावाच्या तरुणाची अनिताच्या नावाच्या तरुणीशी तीन-चार वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. आधी चॅटिंग, नंतर फोनवर गप्पा, या निमित्ताने दोघांमध्ये जवळीक वाढली.

तक्रारदाराच्या भावासोबत तरुणी दुकानात

भीमाराम मुंबईतील एका मोबाईल दुकानात काम करत होता. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचा मामेभाऊ छगनारामसोबत आरोपी तरुणी अनिता एक दिवस त्याच्या मोबाईल दुकानात आली. अनिताला काही पैसे दे, असं छगानारामने भीमारामला सांगितलं. भावाच्या सांगण्यावरुन त्याने अनिताला काही पैसेही दिले. अनिता नर्सची नोकरी करत असल्याची माहिती आहे.

पैशांच्या व्यवहारानंतर ब्लॅकमेलिंग

काही दिवसांनी अनिताने भीमारामला सगळे पैसे परत दिले. त्यामुळे भीमारामचा तिच्यावर विश्वास बसला. त्यानंतर पुन्हा तिने काही पैशांची मागणी केली. तेव्हा भीमारामने तिला 25 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यापैकी केवळ आठच हजार रुपये तिने परत केल्याचा दावा केला जातो.

दरम्यानच्या काळात छगनाराम आणि अनिताने भीमारामला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अनिताने त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला. लग्न न केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही तिने दिली. त्याचवेळी लॉकडाऊन लागल्याने भीमाराम गावी परतला.

तरुणीची आत्महत्येची धमकी

हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. छगनाराम अनितासोबत भीमारामच्या गावी पोहोचला. भीमारामच्या नातेवाईकांकडे अनिताने पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर अनिता वारंवार आत्महत्या करण्याच्या धमक्या देऊ लागली. भीमारामने अखेर पोलिसात धाव घेऊन दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनिता आणि छगनारामविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area