हिंदमाताजवळ पाणी साचण्याची समस्या कायमची दूर होणार, आदित्य ठाकरेंकडून कामाची पाहणी

 


मुंबई : हिंदमाता परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (4 जुलै) या कामांची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी दुपारी हिंदमाता, सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. तसेच ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. (No waterlogging at Hindmata, Aditya Thackeray inspects development works)

मुंबईची भौगोलिक स्थिती आणि पावसाची अनिश्चितता लक्षात घेता, मुसळधार पावसात आणि समुद्राला भरती असल्यास प्रसंगी सखल भागात पावसाचे पाणी साचून समस्या निर्माण होते. हिंदमाता परिसरात उद्भवणाऱ्या या समस्येवर उपाय म्हणून, हिंदमाता परिसरात साचणारे पावसाचे पाणी पंपांच्या साहाय्याने सेंट झेवियर्स मैदान आणि प्रमोद महाजन उद्यान या ठिकाणी बांधण्यात येणार्‍या भूमिगत टाक्यांमध्ये साठवले जाणार आहे. परिणामी हिंदमाता परिसराची समस्या कायमची दूर होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, या कामाच्या पहिल्या टप्प्याची पाहणी आदित्य ठाकरे यांनी आज केली. यावेळी कलापार्कच्या सुशोभीकरण व विकासकामासंदर्भात आराखड्याचे पालकमंत्री ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले.

या पाहणीवेळी खासदार अरविंद सावंत, महानगरपालिका सभागृह नेता विशाखा राऊत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, नगरसेवक समाधान सरवणकर, नगरसेविका प्रीती पाटणकर आणि उर्मिला पांचाळ यांच्यासह उपायुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. राजेंद्र तळकर, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area