आज सांगून मोर्चा काढला, उद्या न सांगता मोर्चा काढू, मग पाहू काय होते ते; नरेंद्र पाटलांचा इशारा

 सोलापूर: मराठा आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पाटील प्रचंड संतापले आहेत. मराठा आक्रोश मोर्चासाठी आम्ही परवानगी मागितली. पण परवानगी नाकारण्यात आली. आज सांगून मोर्चा काढला तर एवढी यंत्रणा उभी केली. उद्या न सांगता मोर्चा काढला जाईल. मग पाहू पुढे काय होते ते, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. (Maratha Reservation Akrosh Morcha For Maratha Reservation in solapur)

नरेंद्र पाटील यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सोलापुरातून आज पहिला आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी आम्ही आठ दिवसांपासून तयारी केली होती. पण महाविकास आघाडीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न केले. राज्यात अनेक मोर्चे निघाले. अनेक आंदोलने झाली. त्यांना परवानगी दिली गेली. ते मोर्चे मोडीत काढले नाहीत. फक्त मराठा मोर्चेच अडवले जात आहेत, असा गंभीर आरोप करतानाच ब्रिटीशांनीही कधी आंदोलने दडपली नाहीत. पण हे सरकार आंदोलन दडपत आहे. हे सरकार ब्रिटीशांपेक्षाही वाईट आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

मूक मोर्चाला परवानगी, मग आक्रोश मोर्चाला का नाही?

राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली. पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे. सातारा आणि सांगलीतून पोलीस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकले आहे, असं सांगतानाच आज सांगून मोर्चा काढला तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली. पण मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू. तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा त्यांनी दिला.

तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सोलापूरच्या वेशीवर मराठा कार्यकर्त्यांना आणि महिलांना अडवण्यात आलं आहे. त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं. नाही तर आम्ही जागचे हलणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हजारो आंदोलकांचा आक्रोश

दरम्यान, आज सोलापूरमध्ये निघालेल्या या आक्रोश मोर्चात शेकडो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. संभाजी चौकात काही काळ हा मोर्चा थांबला. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापचं’ अशा घोषणा देत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. (Maratha Reservation Akrosh Morcha For Maratha Reservation in solapur)


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area