मुंबई APMC फळ बाजारात स्फोट झाला तेव्हा सीसीटीव्ही बंद, बेजबाबदारपणा की षडयंत्र?

 


नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये स्फोट प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी अब्बास खान नावाच्या व्यक्तीला अटक केलीय. सोहेल नावाचा मुलगा हे कृत्य करताना जखमी झालाय. त्यामुळे तो रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये बहुउद्देशीय इमारतीखाली शुक्रवारी (2 जुलै) रात्री 2 वाजता एका गाडीत स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटामुळे मार्केट परिसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी फळ मार्केट परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नाही. त्यामुळे ही घटना घडवून आणण्यासाठी सीसीटीव्ही बंद तर केले गेले नाहीत ना अशी शंका आता उपस्थिती केली जात आहे (CCTV of Navi Mumbai APMC are not working problem in blast investigation).

या भीषण स्फोटात गाडीसह परिसरात काही नुकसान झाल्याने मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय 30 वर्षात पहिल्यांदा हा प्रकार घडल्याने बाजार घटक भीतीच्या छायेत आहेत. याबाबत एपीएमसी पोलिसांनी स्फोट झालेल्या गाडीची तपासणी केली असता ही घटना घडवून आणल्याचे निश्चित झाल्याने पोलिसांनी त्वरित कारवाई केली. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांना तपासणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

“एपीएमसी प्रशासनाने योग्य देखभाल न केल्याने सीसीटीव्ही बंद”

फळ मार्केटमध्ये 2 वर्षांपूर्वी आमदार निधीतून 25 लाख रुपये खर्च करून जवळपास जवळपास 60 सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. परंतू त्याची योग्य देखभाल एपीएमसी प्रशासनाने न केल्याने हे सीसीटीव्ही बंद पडले आहेत. फळ मार्केटमध्ये वास्तव्य करण्यास मनाई असताना येथे हजारो कर्मचारी गाळ्यांच्या पेढ्यांवर बेकायदा वास्तव्य करत आहेत. त्यांची कोणतीच माहिती बाजार समितीच्या संबंधित विभागाकडे नाही.

एपीएमसी प्रशासन जागे न झाल्यास मोठी दुर्घटनेची शक्यता

या ठिकाणी वाहने उभी करण्यास सुद्धा परवानगी नसताना शेकडो रिकाम्या गाड्या रात्रीच्या वेळी येथे पार्क करण्यात येतात. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार अशा काही घटनांना जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर सुद्धा एपीएमसी प्रशासन जागे न झाल्यास मोठी दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area