चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, यवतमाळमध्ये पट्टेदार वाघाचा वावर, शेतकऱ्यांत भीती

 


चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात एका गुराख्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागभीड तालुक्यातील खरकाडा जंगल परिसरात ही घटना घडली. रमेश वाघाडे असं 42 वर्षीय मृत गुरख्याचं नाव असून ते याच भागातील वाढोना गावातील रहिवासी आहेत. (Chandrapur man dies in Tiger attack people demand to catch Tiger)

गुरं चारत असताना वाघाचा अचानकपणे हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार रमेश वाघाडे हे मंगळवारी दुपारी गुरं चारायला जंगलात गेले होते. यावेळी वाघाने त्याच्यावर अचानकपणे हल्ला केला. अचानकपणे हल्ला केल्यामुळे रमेश वाघाडे हे भांबावले. ज्यामुळे वाघाच्या हल्ल्यात त्यांना स्वत:ची सुटका करुन घेता आली नाही. परिणामी या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, जखमी अवस्थेत असताना वाघाडे यांना वाढोना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून वाघाच्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या हिंस्र वाघाचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

यवतमाळमध्ये मांडवी शिवारात पट्टेदार वाघाचा वावर

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मांडवी शेत शिवारात डॉ. रजणलवार यांच्या शेतात पट्टेदार वाघाने ठिय्या मारला. त्यामुळे शेतशिवरात जाणाऱ्या शेतकऱ्यांची काही काळ चांगलीच धावपळ उडाली. सध्या शेतात खरीप हंगामातील शेतीच्या कामाची लगबग सुरू आहे. अशातच वाघाने शेतात मुक्काम ठोकल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. तसेच शेतात पट्टेदार वाघ आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. महिला मजुरांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच वनविभागाने लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिकांना केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area