आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील 9 गावांमध्ये संचारबंदी, चंद्रभागा स्नानासही बंदी

 


पंढरपूर : आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपुरातील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तसेच चंद्रभागा स्नानासदेखील बंदी घालण्यात आली आहे. ही संचारबंदी 17 ते 25 जुलैदरम्यान लागू असेल. आषाढी एकादशी 20 जुलैला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपुरात काही नियम लागू करण्याच्या निर्णय घेतला आहे. (Curfew in 9 villages of Pandharpur due to Ashadhi Wari, Chandrabhaga Snan also banned)

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाची गेल्या आठवड्यातही एक महत्वाची बैठक पार पडली होती. कोरोना संकटाामुळे यंदाची आषाढी एकादशीही प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आषाढी एकादशीपूर्वी काय तयारी करावी लागेल, या अनुषंगाने गेल्या आठवड्यात पंढरपुरातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.

आषाढी वारीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या पालख्या आणि पालख्यांसोबत वारकरी पालखीतळावर आल्यानंतर तिथून पंढरपूरकडे येईपर्यंत, एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत काय काळजी घ्यायची यासंदर्भातील सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या काळात बाहेरुन आलेल्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. पंढरपुरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहेत. वारकरी ज्या ज्या ठिकाणी थांबणार तो मठ आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणचा सर्व परिसर, इमारतींचंही निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या.

प्रांताधिकाऱ्यांच्या सर्व विभागांना सूचना

राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृह, तसंच पंढरपुरात स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकादशी ते पौर्णिमा या कालावधीत शासनाने परवानगी दिलेल्या संतांच्या पालख्या आणि पादुका पंढरपूरमध्ये असणार आहेत. या काळामध्ये पोलीस विभागाने काय काळजी घ्यायची? तसेच नगरप्रदक्षिणा, चंद्रभागा स्नान याबाबतही काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.

योगिनी एकादशी निमित्ताने पंढरीनगरी भाविकांनी फुलली

वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाची आषाढी वारी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोना पार्श्वभूमीवर वारी ही प्रातनिधिक स्वरुपात साजरी करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज योगिनी एकादशी निमित्ताने पंढरीत वारकरी आणि भाविकांनी एकच गर्दी केली.

वारकरी माघारी

कोरोनामुळे पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर योगिनी एकादशी निमित्ताने अनेक वारकरी आणि भाविकांना चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठलाच्या कळसाचे आणि नामदेव पारीचे दर्शन घेऊन माघारी परतावे लागत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area