स्कॉर्पिओच्या ड्रायव्हर सीटखाली गावठी कट्टे, पोलीस समोर येताच पळापळ, मध्यप्रदेश ते राजस्थान व्हाया खान्देश पिस्तूल तस्करी?

धुळे : धुळे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे. मध्यप्रदेशातून अवैधपणे गावठी कट्टे (पिस्तूल) खरेदी करुन राजस्थानात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. धुळे पोलिसांनी शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे गावाजवळ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून 3 पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.

पोलिसांनी सापळा रचला

पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून आरोपींच्या गैरकृत्याबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांना चोपडा येथून दोन इसम JJ 08 BB 5069 या नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीतून अवैधरित्या अग्निशस्त्र घेऊन दोंडायचा मार्गाने राजस्थानकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. संबंधित माहिती शंभर टक्के खरी असल्याची खात्री करण्यात आलेली होती. त्यामुळे पोलिसांनी शिंदखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चिलाणे गावाजवळ सापळा रचला.

पोलिसांनी आरोपींना पकडलं

यादरम्यान गुरुवारी (22 जुलै) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक स्कॉर्पिओ शिंदखेडाकडून दोंडाईचा मार्गाने जाताना दिसली. पोलिसांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागली. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना थांबवलं. पोलिसांनी त्यांचं नाव-गाव विचारलं. यापैकी एकाचं नाव केसाराम जाट (वय 27), तर दुसऱ्याचं नावं भवरसिंग राजपूत (वय 21) असं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ते राजस्थानचे असल्याचंही सांगितलं.

आरोपींनी पिस्तूल नेमक्या कुठे लपवल्या?

पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणलं. तसेच मॅकेनिकच्या मदतीने स्कॉर्पिओची बारकाईने झडती घेतली. यावेळी शस्त्रास्त्रे सापडले. आरोपींनी ड्रायव्हरच्या शिटखाली चेसीसमध्ये एक कप्पा तयार केला होता. त्यामध्ये तीन गावठी पिस्तूले, 16 जिवंत काडतुसे लपवण्यात आलेली होती. पोलिसांनी सर्व शस्त्रे जप्त केली.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपींच्या जवळ असलेले मोबाईल, स्कॉर्पिओसह 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील दोन्ही आरोपींविरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींनी नेमकं कुणाकडून पिस्तूल खरेदी केल्या आहेत? याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच आरोपींनी याआधी देखील राजस्थानमध्ये पिस्तूल विक्री केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area