दरड कोसळण्याचा धोका असलेल्या डोंगरउतारावरील गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार : एकनाथ शिंदे

 

रायगड : डोंगरउतारावर वसलेल्या गावांना दरड कोसळण्यापासून असलेला धोका लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनासाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील महाडजवळील तळीये कोंडाळकर वाडी (Taliye Landslid) या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

नेमकं काय घडलं?

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाड शहर जलमय झालं आहे. तर डोंगरउतारावर वसलेल्या तळीये कोंडाळकरवाडी या गावात गुरुवारी दरड कोसळल्याने संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. शुक्रवारी पहाटेपासून एनडीआरएफची टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने इथे बचावकार्य सुरु झालं. दिवसभरात 36 मृतदेह या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे काम दुसऱ्या दिवशी पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. अंदाजे 80 ते 85 मृतदेह या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केल्याने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

ठाण्याहून विशेष वैद्यकीय पथक

रात्री उशिरा मुसळधार पावसात प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना एनडीआरएफच्या पथकाला केली. मृतांना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. याशिवाय ठाण्याहून विशेष वैद्यकीय पथक आणि टीडीआरएफचं पथक महाडमध्ये पोहोचले असल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.

यापूर्वी देखील रायगड जिल्ह्यातील जुई गाव आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जवळील माळीण गावात दरड कोसळून संपूर्ण गावच्या गाव जमिनीखाली नाहीस झालेलं होतं, त्यानंतर तळीये कोंडाळकरवाडीच्या रूपाने पुन्हा एकदा तशीच दुर्घटना घडल्याने या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलून अशा गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाचे धोरण तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area