‘माझी नाही तर कुणाचीच नाही’, डोक्यात रॉड घालून प्रेयसीची हत्या, नेमकं काय घडलं?

 

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून एका प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून तिची हत्या केलीय. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी प्रियकराने प्रेयसीच्या मृत्यूनंतर स्वत:च्या बचावासाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण उपचारानंतर त्याचा जीव वाचला. अखेर पोलिसांनी आरोपी प्रियकराला जिल्हा शासकीय रुग्णालयातून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य हादरलं आहे.

अचानक प्रेयसीची हत्या

संबंधित घटना ही इटावा जिल्ह्यातील बकेवर पोलीस ठाणे क्षेत्रात घडली आहे. 22 वर्षीय प्रेयसी रुची आणि 25 वर्षीय प्रियकर अमित ऊर्फ खुशीलाल हे एमएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. दोघं एकाच वर्गात शिक्षण घेत होते. विशेष म्हणजे दोघांमध्ये गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण अचानक अमितने रुची हिची हत्या केली.

अमितने प्रेयसीची हत्या का केली?

खरंतर अमित याला रुचीवर संशय आला होता. रुची ही तिच्या नात्यातील एका तरुणाच्या प्रेमात पडली आहे, असा संशय अमितला आला. त्यातूनच त्याने रुचीला थेट शेतात बोलवून लग्नासाठी मागणी घातली. मात्र, रुचीने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे त्याला संताप आला. त्याने रागात रुचीवर लोखंडी रॉडने दोन ते तीन वेळा हल्ला केला. या हल्ल्यात रुचीचा मृत्यू झाला. त्यानंतर अमित तिथून पळून गेला.

रुचीच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं

रुची रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडली असल्याची माहिती गावातील काही लोकांना माहिती पडली. त्याद्वारे ती माहिती तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली. तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने जिल्ह्यातील रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासताच तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या घटनेमुळे रुचीच्या घरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

आरोपी अमितचा आत्महत्येचा प्रयत्न

दुसरीकडे अमितने या घटनेपासून बचाव व्हावा यासाठी विष प्राषाण करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या नातेवाईकांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर दोन दिवस केलेल्या उपचारामुळे त्याचे प्राण वाचले. त्यानंतर पोलिसांनी अमितला शुक्रवारी (23 जुलै) रुग्णालयात जाऊन अटक केली.

अमितकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी अमितची चोकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. रुची जर माझी झाली नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही, असं मी ठरवलं होतं, असंही आरोपीने पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area