‘या’ राज्यात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगला सुरुवात, पहिल्या टप्प्यात 256 जिल्ह्यांचा समावेश

 


मुंबई : केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम बंधनकारक केला होता. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. सध्या याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार सुरुवातीला तमिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या पहिल्या तीन राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सोन्याचे दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे अनिवार्य असणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात 256 जिल्हे या कक्षेत घेण्यात येतील. (Gold hallmarking Mandatory Most districts from Tamil Nadu, Gujarat, Maharashtra for Phase-1 implementation)

याआधी सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे ऐच्छिक होते. मात्र ग्राहक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने सोन्याच्या हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी 228 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 266 जिल्हे निश्चित केली आहेत.

पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशातील 19 जिल्हे

ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या राज्यांच्या  यादीत तामिळनाडूमधील जास्तीत जास्त 24 जिल्ह्यात हॉलमार्किंग अनिवार्य असणार आहे. त्यापाठोपाठ गुजरातचे 23 जिल्हे आणि महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात हॉलमार्किंगचा नियम लागू होणार आहे. तर पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील जवळपास 19 जिल्हे हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आले आहेत.

त्याशिवाय दिल्ली आणि तेलंगाणातील प्रत्येकी सात जिल्हे, आंध्र प्रदेश आणि पंजाबमधील 12 जिल्हे, केरळमधील 13 जिल्हे, कर्नाटक 14 आणि हरियाणामधील 15 जिल्ह्यांचाही यात समावेश आहे. त्याशिवाय देशातील 256 जिल्ह्यातील सराफांना 14, 18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याचे हॉलमार्किंग असलेले दागिने विक्रीची परवानगी असणार आहे.

हॉलमार्किंगच्या दागिन्यांसाठी ग्राहकांना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार’

केंद्र सरकारने 16 जूनपासून देशभरात हॉलमार्क असलेल्याच सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाईल, हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर ग्राहक अजूनही हॉलमार्क (Gold Hallmarking) असलेल्या दागिन्यांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने नोटांबदी आणि जीएसटीप्रमाणेच या निर्णयाची घाईघाईने अंमलबजावणी केल्याचे चित्र दिसत आहे. कारण, नियम लागू होऊन 12 दिवस उलटल्यानंतरही नोंदणी प्रणालीत बरेच बदल बाकी आहेत. त्यामुळे आता Gold Hallmarking ची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत लांबणीवर पडली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area