मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, समुद्रात भरतीचा इशारा; मिठी नदीही तुडुंब भरली

 

मुंबई: अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने मुंबईत जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या 24 वॉर्डांमध्ये यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


तत्पूर्वी मंगळवारी मुंबईत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री 8.30 वाजेपर्यंत राम मंदिर येथे 78 मिमी असा 24 तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे कमाल तापमान 31 अंश तर किमान तापमान 25.5 मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान 31.1आणि किमान तापमान 25.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी येथे तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


मुंबईतील तलावक्षेत्रातही मुसळधार पाऊस

डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांनाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला होता.तलाव पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये

मोडकसागर – 66,092
तानसा- 78,467
मध्य वैतरणा- 37,551
भातसा- 1,97,321
तुळशी- 8,046
विहार- 27,698

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area