फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंग प्रकरण, त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन

 


मुंबई : फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दिले होते. (Home Minister Dilip Walse Patil forms three member enquiry committee to probe Phone Tapping in Devendra Fadnavis tenure)

तीन सदस्यीय समिती

महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. चौकशीनंतर तीन महिन्यात अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीतील फोन टॅपिंग प्रकरणाची ही चौकशी आहे.

नाना पटोलेंची मागणी

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016-17 मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.

अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा घणाघातही नाना पटोलेंनी सभागृहात केला होता.

उच्चस्तरीय चौकशीचे आश्वासन

फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ, असे आश्वासन वळसे पाटील यांनी सभागृहाला दिले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area