बुके घेईन तर शिवेंद्रराजेंकडूनच…, ‘करेक्ट कार्यक्रमा’साठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांच्या मनात काय?

 सातारा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे मुरलेले राजकारणी म्हणून ओळखले जातात. पदोपदी त्याची जाणीव ते करुन देतात. भविष्याच्या राजकारणाची गणितं त्यांच्या डोक्यात असतात. तसंच ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ते ओळखले जातात. आजही त्यांच्या डोक्यात काही वेगळा प्लॅन असावा… कारण साताऱ्याच्या कार्यक्रमात त्यांनी आग्रहच धरला, की ‘बुके घेईन तर भाजप आमदार शिवेंद्रराजेंच्याच हातून…!’

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे साताऱ्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट दिली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे विद्यमान चेअरमन भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या बरोबरच इतर संचालक उपस्थित होते.बुके घेईन तर शिवेंद्रराजेंकडूनच…!

यादरम्यान विविध विषयावर त्यांनी चर्चा झाली. त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाने जेव्हा जयंत पाटील यांचा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ आणला तेव्हा जयंत पाटील यांनी मी फक्त शिवेंद्रराजे यांच्याकडूनच बुके घेणार’ असं म्हटलं.सातारा-जावळीत शिवेंद्रराजेंचं मोठं राजकीय वजन

सातारची जिल्हा बँक ही पक्ष विरहित बँक असल्याची ख्याती सर्वत्र आहे. तसेच सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारची पावसातली सभा मोठ्या प्रमाणात गाजली. त्या सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरणच बदलून गेलं. परंतु ती सभा ज्या सातारा शहरात झाली त्या सातारा-जावळी मतदार संघात मात्र भाजप मध्ये असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला.

त्यावेळीच शिवेंद्रराजेंच्या राजकिय वजन आणि मतदार संघावर असलेली पकड याचा अंदाज सर्वांना आला होता. अगदी सोसायटी पासून ते विधानसभेच्या तीन मतदार संघावर शिवेंद्रसिंहराजे यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच जिल्ह्यात त्यांचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा रामराजे-शिवेंद्रराजे या दोन नेत्यांची मोठी पकड आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांचे जिव्हाळ्याचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.

अजित पवारांसोबत मैत्रीपूर्ण संबंध, आता जयंत पाटील यांचंही मित्रप्रेम

सध्या शिवेंद्रराजे हे भाजपचे आमदार आहेत. याआधी ते राष्ट्रवादी मध्ये होते तेव्हापासून ते आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यांबरोबर त्यांचे नाते हे जिव्हाळ्याचे राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा विरोधी आमदार असूनहीशिवेंद्रराजे यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादी च्या मैत्रीचा प्रत्यय पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area