'तेव्हा आम्ही पूरग्रस्तांना तातडीनं मदत केली होती, हे सरकार का करत नाही?'

 

कोल्हापूर: दोन वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रात जेव्हा पूर आला, तेव्हा आम्ही तातडीने पूरग्रस्तांना मदत केली, आता मात्र सरकार आठ दिवस झाले तरी तातडीची मदत करत नाही, ही मदत ते का करत नाहीत हेच कळत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केला. सरकारने तातडीने पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. (Devendra Fadnavis visits flood hit areas in Kolhapur)

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काल सांगली जिल्ह्याचा दौरा करून तेथील पूरग्रस्तांची संवाद साधला. सकाळपासून ते कोल्हापूर जिल्ह्यातील पूर बाधित ठिकाणी भेट देऊन पाहणी करत आहेत. कोल्हापूर शहर, शिरोळ तसेच करवीर तालुक्यातील चिखली येथे त्यांनी सकाळी पूरग्रस्तांशी संवाद साधला.

फडणवीस म्हणाले, दोन वर्षांपूर्वी या भागात पूर आल्यानंतर आम्ही तातडीने पूरग्रस्तांना मदत केली. तशी मदत यावेळी झाल्याचे दिसत नाही. घरात पाणी आल्यानंतर मोठे नुकसान होते. पुन्हा संसार सुरू करण्यासाठी पैसा लागतो. अशावेळी तात्काळ मदत करणे आवश्यक असते. तरीही सरकार तात्काळ मदत करत नसल्याने पूरग्रस्तांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशी मदत सरकार का करत नाही हेच कळत नाही. परिस्थिती गंभीर असल्यामुळे विनाविलंब सरकारने मदतीची घोषणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले, या भागातील महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी जागतिक बँकेने निधी देण्याचे मान्य केले होते. दोन वर्षे झाली तरी याबाबत सध्याच्या सरकारने कोणताही पाठपुरावा केला नाही. यामुळे हा चांगला प्रकल्प बाजूला पडला आहे. अशावेळी सतत येणाऱ्या महापुरात याचा फटका बसू नये म्हणून महापुराचे पाणी दुष्काळी भागाला वळवायला हवे.

पुरामुळे शेतकरी, व्यापारी, शेतमजूर या सर्वांचेच प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना सरकारने न्याय द्यावा. यासाठी आम्ही या सर्व पूरग्रस्तांच्या पाठीशी राहू असे आश्वासनही त्यांनी पूरग्रस्तांना दिले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिकोडे ,माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area