Umesh Kamat | राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा

 

मुंबई  : अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झालेला उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या चौकशीत नवनवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याला काही महिन्यांपूर्वीच या प्रकरणात अटक झालेली आहे. मात्र आरोपीशी असलेल्या नामसाधर्म्यातून घोळ घालत काही वृत्तवाहिन्यांनी वृत्तांकन करताना मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) याचा फोटो दाखवला. त्यामुळे अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियातून संताप व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला आहे.

काय आहे उमेश कामतची पोस्ट?

“आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन” असा इशारा अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियावरुन दिला आहे.

कोण आहे अभिनेता उमेश कामत?

उमेश कामत हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. 2002 मध्ये आभाळमाया मालिकेतून त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर वादळवाट, असंभव, ह्या गोजिरवाण्या घरात, शुभमकरोति, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट यासारख्या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकांत झळकला. सध्या अजूनही बरसात आहे मालिकेत तो मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे.

समर एक संघर्ष, टाईमप्लीज, लग्न पहावे करुन, बाळकडू, असेही एकदा व्हावे यासारख्या चित्रपटांतही उमेशने काम केलं आहे. तर नवा गडी नवं राज्य, दादा एक गुड न्यूज आहे यासारख्या नाटकांमधील त्याच्या भूमिकाही गाजल्या आहेत. प्रख्यात अभिनेत्री प्रिया बापटसोबत तो 2011 मध्ये विवाहबंधनात अडकला.

राज कुंद्रा प्रकरण काय आहे?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत असल्याचा आरोप आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area