आधी पोलिसांना म्हणाला तुला मधून चिरतो, पोलीस स्टेशनात नेताच ढसाढसा रडत माफी

 मीरा रोड : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करत दाम्पत्याने त्यांच्याशी हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला. नयानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तरुणाला अटक केली. मात्र पोलिसी खाक्या दिसताच तरुणाची अक्कल ठिकाणावर आली, असं म्हणावं लागेल. कारण, पुन्हा असं वर्तन न करण्याची हमी देत तरुणाने पोलिसांची माफी मागितली. आधी अरेरावी आणि नंतर माफीनामा मागतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Mira Road Man abuses Traffic Police apologies after arrest)

काय घडलं नेमकं?

मीरा भाईंदर रस्त्यावरील नो पार्किंगमधील जागेत उभ्या केलेल्या चारचाकी गाडीला वाहतूक पोलिसांनी काल दुपारी जॅमर लावला होता. त्यामुळे संतापलेल्या कार मालक तरुणाने पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली “आपकी वर्दी निकालो यही मारता हू, तेरे को बिच मे से चिर देता हू” अशा शब्दात त्याने पोलिसांवर आवाज चढवल्याचं पाहायला मिळालं. तरुणासोबत असलेल्या त्याच्या पत्नीनेही पोलिसांना धमकावल्याचं समोर आलं आहे.

अरेरावी करणारा नरमला

पोलीस कॉन्स्टेबलने या प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच तरुणाची संपूर्ण हिरोगिरी उतरली आणि तो ढसाढसा रडायला लागला. आरोपी तरुणाचं नाव अरुण रतन सिंह आणि त्याची पत्नीचं नाव मीना अरुण सिंह आहे. हे दोघे पती पत्नी मीरा रोडच्या रामदेव पार्कमध्ये राहतात.

पोलिसांशी हुज्जत आणि शिवीगाळ करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. या दाम्पत्यावर मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अरुण रतन सिंह याला अटक करुन पुढील तपास करत आहे. मात्र माझी चूक झाली, पुन्हा पोलिसांसमोर असं वर्तन करणार नाही, असं त्याने सांगितलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area