पडळकरांकडून राष्ट्रवादी पुन्हा टार्गेट
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. दगडफेकीनंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.
मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?
“मी शरद पवारांवर काय टीका केली होती… मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?”, असा प्रतिप्रश्न पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले.
फडणवीस दरेकर यांचे फोन आले
विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे असं सांगताना मुद्द्यांवर बोला म्हणणारी राष्ट्रवादी आता गुद्द्यांवर का आली, असा सवाल पडळकर यांनी विचारला. दगडफेकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचं पडळकर यांनी सांगितलं.
माझा आवाज कुणी दाबू शकत नाही
“अजित पवारांनी काही आरक्षण घालवलं. ओबीसींचं आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं, असा आरोप पडळकर यांनी केला. तसंच बहुजनांना जागं करण्याचं काम मी करत आहे. माझं हे काम मी थांबवणार नाही. माझा आवाज कुणी दाबू शकत नाही”, असंही पडळकर म्हणाले.
त्यांनी हल्ला केला, आपण विचारांची लढाई विचारांनी लढू
“जरी माझ्या गाडीवर हल्ला झाला असेल तरी माझं आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपण विचारांची लढाई विचारांनी लढू”, असं पडळकर म्हणाले. सोलापूरची पत्रकार परिषद आटपून पडळकर जालन्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.