रेल्वे स्थानकावर कोसळलेल्या आईला वाचवण्याची तळमळ, 2 वर्षीय चिमुकलीने असं काय केलं की सगळीकडे चर्चा

 मुरादाबाद : आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी एका दोन वर्षीय मुलीने मोठं काम केलं आहे. तिने उचललेले पाऊल आणि तिच्या कुषाग्र बुद्धीची अनेकजण वाहवा करत आहेत. आपल्या बेशुद्ध असलेल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी या मुलीने जे केलं आहे, ते वाचून प्रत्येकाचा उर दाटून येईल. उत्तरप्रदेशमधील मोरादाबाद रेल्वेस्थानकावरील हा प्रकार आहे. (Moradabad Railway Station Two years old girl saved his unconscious mother)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार मुरादाबाद रेल्वेस्थानकावर एक महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्याजवळ एक सहा महिन्यांचा मुलगा होता. तसेच तिची दोन वर्षांची मुलगी बाजूला बसून रडत होती. या महिलेच्या बाजूला सामानाची बॅग आणि पाण्याच्या बॉटल पडलेल्या होत्या. कशाचीही शुद्ध नसल्यामुळे या महिलेचे सहा महिन्यांचे बाळ सारखे रडत होते. तर दोन वर्षांची चिमुकली हीसुद्धा मदतीच्या अपेक्षेने प्रत्येकाकडे पाहत होती. आपल्या आईला कोणी शुद्धीवर आणले नाही तर तिचे प्राणही जाऊ शकतील हे या दोन वर्षीय मुलीने कदाचित ताडले होते. म्हणूनच की काय धड बोलताही येत नसलेल्या या मुलीने धाडसी काम करुन दाखवले आहे. आपल्या आईला वाचवण्यासाठी तिने थेट आरपीएफ जवानांकडे धाव घेतली आहे.

महिला आरपीएफ कॉन्स्टेबलकडे चिमुकलीची धाव

मोरादाबाद रेल्वेस्थानकावर आपली आई बेशुद्ध होऊन पडल्यामुळे ही दोन वर्षीय मुलगी धाय मोकलून रडत होती. तिला काय करावे हे सूचत नव्हते. शेवटी तिला रेल्वे स्थानकावर उभे असलेले आरपीएफचे जवान दिसले. तिने तत्काळ दूर उभ्या असलेल्या महिला आरपीएफ कॉन्स्टेबलकडे धाव घेतली. तिने या महिला कॉन्स्टेबलचा थेट हात पकडला. तसेच ही छोटी मुलगी या महिला कॉन्स्टेबलला तिच्या आईकडे खेचून नेऊ लागली.

महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले

ही मुलगी काय करते आहे; हे महिला कॉन्स्टेबलला सुरुवातीला समजलेच नाही. नतंर महिला कॉन्स्टेबल त्या मुलीसोबत चालायला लागली. शेवटी त्या दोन वर्षीय चिमुकलीची आई बेशुद्धावस्थेत पडल्याचे आरपीएफच्या जवानांना समजले. नंतर आरपीएफच्या जवानांनी घडलेल्या घटनेची माहिती जीआरपीला (Government Railway Police) दिली. तसेच जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दोन वर्षीय चिमुकलीची सगळीकडे वाहवा

दरम्यान, सहा महिन्यांचे मुल आणि दोन वर्षीय मुलगी असलेल्या या तीस वर्षीय महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिलेची सध्यातरी ओळख पटू शकलेली नाही. मात्र, आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणीऱ्या या दोन वर्षीय चिमुकलीची सगळीकडे वाहवा होत आहे. सगळे या छोट्या मुलीच्या धैर्याला पाहून सलाम ठोकत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area