“हमारा नेता कैसा हो…” म्हणताच बैलगाडी तुटली, काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप कोसळले, व्हिडीओ व्हायरल

 


मुंबई : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीचा प्रश्न काँग्रेसने लावून धरला आहे. या दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केले जात आहे. काँग्रेसने मुंबईतही अशाच प्रकराच्या जनआंदोलनाचे आज (10 जुलै) आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान एक विचित्र घटना घडली. या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai jagtap) बैलगाडीवरुन जमिनीवर कोसळले. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या व्हायरल होत आहे. (Mumbai Congress activists and Bhai jagtap collapse from Bullock cart while protesting against Petrol Diesel price hike)

काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन

मागील अनेक दिवसांपासून देशभरात सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. अनेक राज्यांत पेट्रोल शंभरीपार गेले आहे. याच कारणामुळे राज्यात काँग्रेसतर्फे मागिल काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसनेसुद्धा आज अशाच प्रकारचे आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलनामध्ये एक बैलगाडी आणण्यात आली होती.

भाई जगताप जमिनीवर कोसळले 

या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच “देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो !” अशासुद्धा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी कांग्रेस कार्यकर्तेही खाली कोसळले. बैलगाडीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हेसुद्धा उभे होते. बैलगाडी अचानकपणे तुटल्यामुळे तेसुद्धा जमिनीवर कोसळले.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक खोचक ट्वीट केले आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करुन माणसाने झेपेल तेच करावं असा खोचक सल्ला भाई जगताप यांना दिला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area