आई सतत दारुच्या नशेत असल्याचा राग, वसईत 18 वर्षांच्या मुलाकडून सख्ख्या आईची हत्या

 


वसई : आई सतत दारुच्या नशेत असते, म्हणून किशोरवयीन मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरात 59 वर्षांच्या महिलेची मंगळवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी 18 वर्षांच्या सख्ख्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

वसईत 18 वर्षांच्या तरुणाने आपल्या 59 वर्षांच्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. आई सतत दारुच्या नशेत असते, या रागातून मुलाने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये मंगळवार 21 जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला. आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, तर आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साताऱ्यात पत्नीच्या व्यसनाला कंटाळून हत्या

दुसरीकडे, साताऱ्यात पतीने लाकडी दांडक्याने वार करत पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नीला दारुचे व्यसन असल्याच्या रागातून पतीने हत्या केल्याचा आरोप आहे. योगायोग म्हणजे हत्येच्या कारणात साधर्म्य असलेल्या या दोन्ही घटना एकाच दिवशी उघडकीस आल्या, एक साताऱ्यात तर दुसरी वसईत.

पत्नीला दारु पिण्याचं व्यसन होतं, आपल्याला ते आवडत नव्हतं. यावरुन सतत भांडणं व्हायची. घटनेच्या दिवशी पुन्हा भांडणं झाली. त्यावेळी वाद जास्त विकोपाला गेला, असं साताऱ्यातील आरोपी पतीने सांगितलं आहे.  रागाच्या भरात लाकडी दांडक्याने डोक्यावर घाव घालत त्याने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.

ठाण्यात स्क्रू ड्रायव्हर खुपसून आईची हत्या

दरम्यान, छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसून मुलाने आपल्या सख्ख्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यात उघडकीस आली होती. आरोपी मुलगा कमवलेल्या पैशांची उधळपट्टी करायचा. हत्येच्या दिवशीही पैसे देण्यावरुन मायलेकात वाद झाला. त्यानंतर राग अनावर झाल्याने मुलाने जवळच पडलेला स्क्रू ड्रायव्हर आईच्या छातीत खुपसला. हा वार एवढा गंभीर होता, की आई जागीच गतप्राण झाली. मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरातून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area