बर्थडे पार्टीसाठी बोलावून गुंगीचे औषध, मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार

 

मुंबई : मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावून तिला गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर हॉटेल रुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिला आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाल्याची माहिती आहे.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अविन अग्रवाल असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीच्या विरोधात भादंवि कलम 328 आणि 376 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण अंधेरीतील वर्सोवा पोलिस ठाण्यातून शून्य एफआयआर अंतर्गत वरळी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. गुन्हा नोंदवून घेतल्यानंतर अद्यापही आरोपी फरार आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपीने पीडितेला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावलं होतं. मात्र संबंधित फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बोलावून तिच्या ड्रिंकमध्ये आरोपीने गुंगीचं औषध मिसळून दिल्याचा आरोप आहे. पेय प्यायल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली होती. शुद्धीवर आल्यानंतर ती रुममध्ये एकटीच होती. या घटनेची माहिती तिने कुटुंबियांना दिली. कुटुंबीयांनी आधी डॉक्टर आणि नंतर जवळच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित महिला आणि आरोपीची सोशल मीडियावर ओळख झाल्याची माहिती आहे.

मुंबईत चिमुरडीवर बलात्कार

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना काहीच दिवसांपूर्वी मुंबईत उघडकीस आली होती. 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 28 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. मुलीला एकटंच पाहून आरोपीने तिला आईस्क्रिम देण्याच्या बहाण्याने बोलावलं. त्यानंतर मुलीला सोबत नेऊन तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहत असल्याची माहिती आहे.
पीडितेच्या आईच्या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 28 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आयपीसी कलम 376 सोबतच पॉक्सो अॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area