मुंबई : मुंबईतील दहिसर-बोरिवली भागात वकिलावर तलवार हल्ला केल्याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सत्यदेव जोशी यांना भररस्त्यात मारहाण करुन तलवारीने वार करण्यात आले होते. या प्रकरणी आधी तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे. तलवार हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
18 जुलै रोजी बोरिवली पश्चिमेला कांदरपाडा भागात ही घटना घडली होती. तलवार हल्ल्यात वकील सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. वकिलावर झालेल्या तलवार हल्ल्याची दृश्यं मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहेत.
उस्मानाबादेत डॉक्टरचा वकिलावर हल्ला
दुसरीकडे, न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामधील वकीलपत्र सोडून दे, अन्यथा जीव घेऊ, अशी धमकी देत उस्मानाबादमध्ये वकिलावर डॉक्टरने जीवघेणा हल्ला केला होता. वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहिते हे डॉ. मोरेंचे मेहुणे असल्याची माहिती आहे.