रात्री 21 वर्षीय युवकाची सात जणांकडून हत्या, सकाळी मुख्य आरोपीचा दगडाने ठेचून खून, नागपूर हादरलं

                                  

नागपूर : नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकामागून एक अशी दोन हत्याकांडं झाल्याने गँगवॉर घडल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एका हत्येचा बदला घेण्यासाठी अवघ्या काही तासात दुसऱ्याची हत्या करण्यात आली. 21 वर्षीय युवकाच्या हत्येनंतर त्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मारहाण करत दगडाने ठेचून खून करण्यात आला.

आधी 21 वर्षीय युवकाचा खून

कौशल्या नगर परिसरात स्वयंदीप नगराळे नावाच्या 21 वर्षीय युवकाचा खून झाला. परिसरातील 7 ते 8 युवकांकडून त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेत अजनी पोलिसांनी तात्काळ 3 आरोपींना अटक केली, मात्र या खुनातील मुख्य आरोपी शक्तिमान गुरुदेव हा फरार होता.

नंतर मुख्य आरोपीची हत्या

परिसरातील काही युवकांना शक्तिमान हा भांडे प्लॉट चौकाजवळ आपल्या नातेवाईकाच्या घरी लपून असल्याची माहिती मिळाली. त्यासोबतच त्यांनी शक्तिमानला पकडून कौशल्या नगर परिसरात आणले आणि त्याला मारहाण करत त्याची दगडाने ठेचून हत्या केली.

स्वयंदीपचा खून कसा झाला?

21 वर्षीय स्वयंदीप नगराळे हा काल (शुक्रवारी) रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर असलेल्या ऑटोमध्ये बसला होता. त्यावेळी त्याच्यावर 7 युवकांकडून शस्त्रानिशी हल्ला करण्यात आला. त्यात स्वयंदीपचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली.

दुसऱ्याच दिवशी (शनिवारी) सकाळी आरोपी शक्तिमानचा देखील दगडाने ठेचून खून झाला. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी शक्तिमानचा परिसरात दबदबा होता आणि त्याच्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते, तर काही ठिकाणी अवैध जुगार अड्डा या हत्येच्या मागचे खरं कारण असल्याचे बोलले जात आहे.

नागपूर पोलीस आयुक्त घटनास्थळी

एकंदरीतर मागच्या 12 तासात नागपूरमध्ये झालेल्या या थरारक हत्याकांडांमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला तर नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area