500 रुपयांचा थर्मास, पाच लाखांची लूट, ऑनलाईन शॉपिंग करताना नागपूरच्या ग्राहकाची फसवणूक

 

नागपूर : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं कसं गरजेचं आहे, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. नागपुरातील एका व्यक्तीला 500 रुपयांची शॉपिंग तब्बल 5 लाखांना पडली. गुगलवर सर्च केलेल्या नंबरवर संपर्क केलेल्या ग्राहकाची फसवणूक झाली.

नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या एका लोको पायलटने ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन पाचशे रुपयांना खरेदी केलेला थर्मास तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त किमतीला पडला. विकत घेतलेला थर्मास पसंतीस न पडल्याने विज्ञान मेश्राम यांनी तो परत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गुगलवरुन त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क केला. मात्र ते ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आले.

टोळीने विज्ञान मेश्राम यांना एनीडेस्क नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी विज्ञान मेश्राम यांच्या खात्यातून तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक केली. या संदर्भात विज्ञान मेश्राम यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

थर्मास परत नेण्याची तक्रार

सारेच काही ऑनलाईन उपलब्ध होऊ लागले असताना फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. नागपूरमधील कपिल नगरच्या शेंडे नगर भागात राहणारे रेल्वे लोको पायलट विज्ञान प्यारेलाल मेश्राम यांनी एका ऑनलाईन साईटवरुन थर्मास विकत घेतला. त्याचे पेमेंटही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केले होते. निर्धारित वेळेत थर्मासची डिलिव्हरीही झाली, मात्र तो पसंत न आल्याने विज्ञान मेश्राम यांनी थर्मास परत करण्यासाठी त्या कंपनीला रिक्वेस्ट पाठवली.

पैसे परत न मिळाल्याने धावाधाव

कंपनीच्या माणसाने तो थर्मास परत घेऊन गेल्यानंतर काही दिवसांमध्ये पैसे परत मिळतील, असं त्यांना सांगितलं होतं. मात्र पैसे परत न मिळाल्याने विज्ञान मेश्राम यांनी गुगलवरुन त्या कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला आणि त्यांना आपली तक्रार सांगितली. मुळात ते सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आले होते.

पैसे परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी विज्ञान मेश्राम यांच्याकडून बँकेची सर्व माहिती काढून घेतली, त्यानंतर क्षणात विज्ञान मेश्राम यांच्या बँक खात्यातून 5 लाख 250 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विज्ञान मेश्राम यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करा, मात्र सावध राहून.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area