नांदेड : गँगवॉरमधून कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. दोन दुचाकींवर आलेल्या दुसऱ्या टोळीतील गुंडांनी विक्की ठाकूर नावाच्या गुंडाचा पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर विक्कीवर तलवारीने सपासप वार केले. नांदेड शहरातील गाडीपुरा भागात मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
नेमकं काय घडलं?
मयत विक्की ठाकूर नुकताच तुरुंगातून जामिनावर सुटला होता. रात्री तो आपल्या घराजवळ थांबला असता दोन बाईक्सवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. यावेळी नेम चुकवून विक्की ठाकूर धावत सुटला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर त्याच्या शरीरावर तलवारीने अनेक वार करण्यात आले, यात विक्की ठाकूर हा जागीच ठार झाला. पुन्हा हवेत गोळीबार करून आरोपी पसार झाले.
विक्की ठाकूर हा कुख्यात गुंड विक्की चव्हाण याचा साथीदार होता. वर्षभरापूर्वी कैलास बिगानिया नामक गुंडाने विक्की चव्हाण याचा खून केला होता. बिगानिया गॅंगनेच आता चव्हाण याचा साथीदार विक्की ठाकूर याचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.
नागपुरातही कुख्यात गुंडाची हत्या
याआधी, नागपुरात 7 जुलैच्या रात्री कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. अक्षय जयपुरे याच्यावर हत्या, हत्या करण्याचा प्रयत्न असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. तो सहा महिन्यांआधी जेलमधून बाहेर आला होता. तो पांढरबोडी भागात दाखल झाल्याची माहिती आरोपींना मिळाली. त्यानंतर काही जणांनी सापळा रचून त्याला चारही बाजूने घेरलं. त्यानंतर त्याला प्रचंड मारहाण केली. तसेच अक्षयच्या डोक्यात दगड आणि विटाही मारल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.