नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाखांची चोरी, पोलिसात गुन्हा

 

नाशिक : नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून 5 लाख रुपयांच्या नोटा चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली होती. चोरी प्रकरणी पोलिसांकडून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी थेट करन्सी नोट प्रेसमध्ये जाऊन तपास केला. नोट प्रेस प्रशासनाकडूनही अंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण

हाय सिक्युरिटी झोन असलेल्या आणि देशभरातील नोटा छपाईचं मुख्य केंद्र असलेल्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरु झाली आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडरही तयार नाहीत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता, पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावं लागलं, अशी चर्चा आहे.

फेब्रुवारीपासून बंडल गहाळ

दरम्यान, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. 500 रुपयांचे 10 तयार बंडल (शंभर नोटांचे एक बंडल) असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचं पोलिसांनी सांगितले. 12 फेब्रुवारीपासून हे बंडल गहाळ झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या तपासा दरम्यान करन्सी नोट प्रेस मधील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जातील असं पोलीस आयुक्त विजय खरात यांनी सांगितलं आहे.

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये यापूर्वी देखील चोरीच्या तुरळक घटना घडल्या, मात्र प्रशासनाने अंतर्गत चौकशीतच हे प्रकरण निकाली काढले होते. यावेळी मात्र प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस तपासात या प्रकरणाचे अनेक कंगोरे समोर येण्याची शक्यता आहे.

नाशिक करन्सी नोट प्रेसचा इतिहास

नाशिकमध्ये सिक्युरिटी नोट प्रेसची स्थापना 1924 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. 1928 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट या नोट प्रेसमध्ये छापण्यात आली. 1980 पर्यंत सिक्युरिटी प्रेसमध्येच नोटा छापल्या जात होत्या. 1980 नंतर करन्सी नोट प्रेसमध्ये नोटा छपाईला सुरुवात झाली. करन्सी नोटप्रेसमध्ये 5, 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा छापल्या जातात. वर्षाला सरासरी 4 हजार दशलक्ष नोटा छापल्या जातात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area