नवी मुंबई : फळ व्यावयासिकावर लोखंडी रॉडने हल्ला; गुन्हा दाखल

 

नवी मुंबई : एपीएमसीतील फळव्यापारी शहाबाज राहत खान (२७) व फैज ताहीर खान (२१) या दोघा भावांवर सहा हल्लेखोरांनी लाकडी बांबू, लोखंडी रॉडने व चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कोपरी पुलाखाली घडली. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी दोघा भावांजवळ असलेली चार लाख ७० हजारांची रक्कम लुटून नेली असून एपीएमसी पोलिसांनी या हल्लेखोरांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या शहाबाजवर वाशीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहाबाज हा घणसोलीत राहण्यास असून तो एपीएमसी मार्केटमधील फळ व्यावसायिक आहे. आरोपी अरबाज नौशाद खान, शहाबाज अफताफ खान, नौशाद वाहिद खान व आफताब वाहीद खान यांचादेखील एमपीएमसीतील फळ मार्केटमध्ये व्यवसाय आहेत. दोन महिन्यांपूर्वी आरोपी व शहाबाज यांच्यामध्ये व्यावसायिक वादातून भांडण झाले होते. त्यानंतर ते सामोपचाराने मिटविण्यात आले होते.
मंगळवारी सायंकाळी शहाबाज व त्याचा चुलत भाऊ फैज खान हे दोघे एपीएमसीतील फळ मार्केटमधून मोटरसायकलवरून घणसोली येथील घरी जात होते. यावेळी कोपरी पुलाखाली दडून बसलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून शहाबाज व फैज या दोघांना रस्त्यात अडवून त्यांना लाकडी बांबू, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर या हल्लेखोरांनी शहबाजच्या डोक्यावर चाकूने हल्ला केल्याने तो जबर जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्याजवळील चार लाख ७० हजारांची रोख रक्कम लुटून पलायन केले. सहा हल्लेखोरांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुमेध खोपीकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area