प्रियकराला वश करण्यासाठी लाख गमावले; बंगाली बाबाला अटक

 नवी मुंबई
काळी जादू व तंत्रमंत्राने प्रियकराला वश करून देण्याचा बहाणा करून खारघरमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीकडून तब्बल चार लाख ५७ हजार रुपये उकळणाऱ्या वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली (३३) या भामट्याला गुन्हे शाखा युनिट- दोनच्या पथकाने मिरा रोड येथून अटक केली आहे. आरोपी बाबा बंगाली याने अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केली असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

खारघरमध्ये राहणारी पीडित तरुणी सॉफ्टवेअर इंजिनीअर असून प्रेमभंग झाल्याने ही तरुणी मागील काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली आली होती. या दरम्यान तरुणीने लोकलमधून प्रवास करताना, बाबा कबीर खान बंगाली याची विविध अडचणींवर उपाय करण्याबाबतची जाहिरात वाचली होती. त्यामुळे तरुणीने या जाहिरातीत दिलेल्या मोबाइल नंबरवर बाबा कबीर खान याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी बाबा कबीर खान याने मेरठ येथील दर्ग्यामध्ये काही पूजा विधी केल्यास, तिच्या प्रियकरावर काळी जादू तसेच मंत्र विधी केल्यास तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीकडे न जाता तिच्याकडे ओढला जाईल, असे सांगितले होते. तसेच, या बाबा बंगालीने वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी तरुणीकडून एकूण चार लाख ५७ हजार रुपये उकळले होते. त्यानंतर फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बाबा बंगालीविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी, व इतर अमानुष व अनिष्ट, अघोरी कृत्य प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू या कलमांखाली गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गिरीधर गोरे व त्यांच्या पथकाकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता.

या तपासादरम्यान, गुन्हे शाखेने बंगाली बाबाच्या वेगवेगळ्या गुगल पे क्रमांक, बँक खात्याची व केवायसी कागपत्रांची माहिती घेऊन त्यावरून बाबाचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक वैभव रोंगे व त्यांच्या पथकाने सीडीआर विश्लेषण करून बाबा बंगाली याला मिरा रोड येथील गोविंदनगरमधील समर्थ अपार्टमेंटमधून ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आरोपी बाबाच्या मोबाइलवर गुगल पे अकाऊंटवर पीडित मुलीने पाठविलेल्या रक्कमेची 'एंट्री' आढळून आली. मोबाइल क्र., बँकखात्यावरून काढला माग पीडित तरुणीने आरोपी बंगाली बाबाला प्रत्यक्षात पाहिले नव्हते. तो कसा दिसतो, याबाबत तिला काहीच माहिती नव्हती. तसेच, आरोपी बंगाली बाबा हा वारंवार मोबाइल व राहाण्याचे ठिकाण बदलत असतानादेखील गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बाबा बंगालीचा मोबाइल क्रमांक, बँकखाते तसेच बातमीदाराकडून माहिती मिळवून हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. या बाबा बंगालीकडून कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी गुन्हे शाखा अथवा खारघर पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area