शेतकऱ्यांना डाळींचा हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, पाशा पटेल यांचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना साकडं

 


मुंबई : केंद्र सरकारच्या डाळींच्या साठवणुकीवर बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा या साठी प्रयत्न करा अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी डाळीच्या साठवणुकीवर बंदी घातली. त्यानंतर देशभरात व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधून केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांना परिस्थितीची माहिती देण्यासंदर्भात सुचवले होते. त्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात पाशा पटेल यांनी गोयल यांची भेट घेतली. (Pasha Patel meet Piyush Goyal to demand guarantee for pulses)

केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि पाशा पटेल यांच्या बैठकीला व्यापारी प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. सरकारच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या आहेत. साठवणुकीच्या मर्यादा आल्याने डाळींच्या दरामध्ये 500 ते 1 हजार रुपयापर्यंत घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये डाळी विकाव्या लागत आहेत. या विषयात वाणिज्य मंत्र्यांनी लक्ष घालावे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे. डाळींचा हंगाम संपलेला आहे. सरकारने हमीभावाची खरेदी केंद्र बंद केली आहेत. मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता तेजी-मंदीचा फायदा घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी माल घरात ठेवलेला आहे. त्यांना आता कमी दरात विक्री करावी लागत आहे, अशी माहिती पाशा पटेल यांनी या बैठकीत गोयल यांना दिली. शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन गोयल यांनी दिल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं.

डाळवर्गीय शेतीमालासाठी साठवण मर्यादा निश्चित

केंद्र शासनाने डाळवर्गीय शेतीमालासाठी साठवण मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना पाच टन, तर घाऊक व्यापाऱ्यांना 200 टन इतकाच डाळींचा साठा करता येणार आहे. या निर्णयाविरोधात राज्यात येत्या 16 जुलैला बाजार समित्या एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आशिया खंडातील मोठी बाजारपेठ असलेले मुंबई एपीएमसी मार्केटमधील मसाला आणि धान्य मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महिना ग्रोमाचे सचिव भीमजी भानुशाली यांनी दिली आहे.

डाळीच्या बाजार समित्या 16 जुलैला बंद

गेली 120 वर्षांपासून व्यापाऱ्यांसाठी ग्रोमा संस्था काम करते. त्याशिवाय सरकारच्या प्रत्येक निर्णयात आमचे सहकार्य असते. पण ग्रोमाला विश्वासात न घेता रातोरात हा कायदा करण्यात आला असल्याने आम्ही त्याचा विरोध करतो. त्यामुळे भारतातील संपूर्ण डाळीच्या बाजार समित्या 16 जुलैला बंद राहणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area