नवी दिल्ली: एका दिवसाच्या स्थिरतेनंतर शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये साधारण 30 ते 39 पैसे आणि डिझेलच्या दरात 24 ते 32 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी (Petrol rate) 106.93 आणि प्रतिलीटर डिझेलसाठी 97.46 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी बुधवार आणि गुरुवारी इंधनाच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाली होती. त्यानंतर कालच्या दिवसात इंधनाचे दर स्थिर होते. (Petrol and Diesel rates in country)
दिल्लीतही प्रतिलीटर पेट्रोलची किंमत 100.91 आणि डिझेलचा दर 89.88 इतका आहे. तर कोलकातामध्ये प्रतिलीटर पेट्रोलसाठी 101.01 रुपये आणि डिझेलसाठी 92.97 रुपये मोजावे लागत आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील शहरांमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलने 105 रुपये प्रतिलीटर हा टप्पा गाठला असून डिझेलही लवकरच शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहे.
जुलै महिन्यात सहावेळा दरवाढ
जुलै महिना उजाडल्यापासून पेट्रोलच्या दरात सहावेळा तर डिझेलच्या दरात चारवेळा दरवाढ झाली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात तब्बल 16 वेळा दरवाढ झाली होती. मे महिन्यातही इंधनाच्या दरात 16 वेळा उसळी पाहायाला मिळाली होती. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 4 मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायला सुरुवात झाली होती. या निवडणुकीच्या काळात सलग 18 दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इंधनाचे दर झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती.
17 राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार
पेट्रोलने शंभरी गाठलेल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, जैसलमेर, गंगानगर, हैदराबाद, लेह, बसवाडा, इंदौर, जयपूर, भोपाळ, ग्वाल्हेर, गुंटुर, काकिनाडा, चिकमंगळुरू, शिवामोग्गा आणि चेन्नईचा समावेश आहे.
आतापर्य़ंत देशातील 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरीच्या पलीकडे गेले आहे. यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, बिहार, केरळ, सिक्कीम, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.