शिल्पा शेट्टीला क्लिन चिट नाहीच; पोलिसांच्या हाती लागली महत्त्वाची माहिती

मुंबई: बॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्यासाठी आलेल्या तरुणींना भूमिका देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने अश्लील भूमिका करून चित्रपट बनवल्याप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रा याच्या मॅकबूक आणि मोबाइलमधून पोलिसांना नऊ डिजिटल फाइल सापडल्या आहेत. शेकडो जीबीच्या या फाइलची पोलिसांकडून बारकाईने तपासणी सुरू असून, त्यातून कुंद्राच्या काळ्या धंद्याची कुंडली हाती लागण्याची शक्यता आहे.


अश्लील चित्रपटांचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर यामध्ये राज कुंद्रा अर्थपुरवठा करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिसांनी त्याचे जुहू येथील निवासस्थान, अंधेरी येथील कंपन्यांची दोन कार्यालये यामध्ये जाऊन झडती घेतली. यामध्ये बरेच आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. छुपे कपाट, मॅकबूक, मोबाइल तसेच इतर अनेक वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातूनही जवळपास नऊ डिजिटल फाइल सापडल्या असून, त्यांचा आकार शेकडो जीबी असल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दोन बँक खाती सील

पोलिसांनी राज कुंद्राची कोटक आणि सिटी बँकेतील खाती सील केली आहेत. या खात्यांमध्ये अनेक परदेशी आर्थिक व्यवहार दिसून आले आहेत. कुंद्राला अॅपल कंपनीकडून एक कोटी ६४ लाख रुपये मिळाल्याचे दिसून येत आहे. गुगल प्ले स्टोरमधून हॉटशॉट्सच्या माध्यमातून त्याने किती कमाई केली याची माहिती गुगल कंपनीकडून घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिल्पाला अद्याप क्लीन चिट नाही


अश्लील चित्रपट तयार करून ते प्रदर्शित केल्याप्रकरणी पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचीही चौकशी केली. कुंद्राच्या मालकीच्या विआन कंपनीच्या संचालकांमध्ये शिल्पाचाही समावेश होता. मात्र महाराष्ट्र सायबरमध्ये पहिला गुन्हा दखल होताच, तिने राजीनामा दिला होता. परंतु मुंबई गुन्हे शाखेकडे असलेल्या गुन्ह्यात अद्याप तिला क्लीन चिट दिली नसून आमचा सर्व बाजूने तपास सुरु असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area