राज्य सरकारच्या बेफिकिरीमुळेच स्वप्निल लोणकरची आत्महत्या; प्रवीण दरेकरांची टीका

 


मुंबई: एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. स्वप्निल लोणकरची आत्महत्या ही राज्य सरकारची बेफिकिरी असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

नैराश्यातून समाजातील विविध व्यथित घटक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी आर्त हाक प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिली आहे. या युवकाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आता तरी जागे व्हा

पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करू नये. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले, असं ते म्हणाले. कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा, प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे आणि आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन परीक्षा व नोकरीसाठी तात्काळ उपाय योजना व अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पडळकर म्हणतात हा खूनच

स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला घेरलं आहे. स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून आहे. स्वप्नीलप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट पाहत आहे का?, असा सवाल पडळकर यांनी केला. येत्या आठ दिवसात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देतानाच सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थांना तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दोन वर्षे मुलाखती होत नाहीत हे दुर्देवच

एमपीएससीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area