राजू सापते आत्महत्या प्रकरण, व्हिडीओत नाव घेतलेल्या नरेश मिस्त्रीलाही अटक, तिघांचा शोध सुरु पिंपरी चिंचवड : मुंबईतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते (Raju Sapte) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिस्त्री नरेश विश्वकर्मा याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काल सापतेंचा व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरेला अटक झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध करत राजू सापतेंनी युनियनचे पदाधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी नरेश मिस्त्रीचं नाव घेतलं होतं. 

कला दिग्दर्शक राजू सापते यांनी शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. राजू सापते आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत दोन जण अटकेत आहेत. तर उर्वरित तिघांच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलीस मुंबई पोलिसांचीही मदत घेत आहेत. मुंबई पोलिसांच्या तीन पथकांसह पिंपरी चिंचवड पोलिसांची दोन पथकं तिघा आरोपींच्या शोधात आहेत. लेबर युनियनचे राकेश मौर्य, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे यांचा शोध सुरु आहे. राजेश सापते यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

व्हिडीओमध्ये काय म्हणले राजू सापते?

आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजू सापते म्हणाले होते, ‘मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’

‘हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतावत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तात्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area