एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा ईडी कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

 

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी (Pune Bhosari MIDC Land Scam) अटकेत असलेल्या गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना 19 जुलैपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. गिरीश चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. चौधरी यांना 5 जुलैला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून ते ईडीच्या कोठडीत आहेत.

कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

2016 मध्ये पुणे येथे MIDC जमिनीबाबत घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने ही गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी आज कोर्टात केला. तर या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यलयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे 7 दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केला. त्यानंतर कोर्टाने 19 जुलै पर्यंत म्हणजे 4 दिवसांची ईडी कोठडी दिली.

भोसरी जमीन घोटाळा काय आहे?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं (Pune Bhosari MIDC land scam NCP leader Eknath Khadse son in law Girish Chaudhari ED custody till 19th July).

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area