पुुणे : सोनसाखळी चोरांचा उच्छाद; एकाच दिवसात घडल्या जबरी चोरीच्या ४ घटना

शहरात एकाच दिवसात जबरी चोरीच्या चार घटना घडल्या असून, लॉकडाउन काळात थंडावलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. कर्वेनगर येथे एका महिलेचे मंगळसूत्र आणि खडकी बाजार येथे एक मुलीची सोनसाखळी हिसकावून नेण्यात आली.

सोनसाखळी आणि मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढत आहेत. गुरुवारी एका दिवसात शहरात अशा प्रकारच्या चार गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामधील दोन गुन्हे सोनसाखळी हिसकावण्याचे आहेत. कर्वेनगर येथे एक ४७ वर्षीय महिला गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास औषधे आणण्यासाठी पतीसोबत पायी निघालेल्या असताना, दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  दुसरी घटना खडकी बाजार येथील भाजी मंडईजवळ घडली. एका ५१ वर्षीय महिलोची मुलगी दुकानात खरेदी करीत होती. त्या वेळी ती महिला नातीला कडेवर घेऊन दुकानाबाहेर थांबली होती. तेव्हा तेथून पायी चाललेल्या एका तरुणाने नातीच्या गळ्यातील अंदाजे ७६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर बाजारपेठेतील नागरिकांनी चोराला पकडले. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला अटक केली. हंबीरराव सुकाळे (वय २८, रा. भोसरी) असे सोनसाखळी चोराचे नाव आहे, ही माहिती उपनिरीक्षक प्रताप गिरी यांनी दिली.

  रिक्षाचालकाला लुटले

  पुणे स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला रिक्षा उभी करून मोबाइलवर बोलत थांबलेल्या रिक्षाचालकाला दोघा अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून लुटल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी ११ ते पावणेबाराच्या सुमारास घडला. आरोपींनी रिक्षाचालकाच्या डोळ्यात बोट घातले, बरगडीला जोराचा चावा घेऊन जखमी केले. या प्रकरणी अतुल महादेव लोंढे (वय ३८, रा. अप्पर इंदिरानगर) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


  तृतीयपंथीयाने हिसकावला दुचाकीस्वाराचा मोबाइल


  साधू वासवानी चौक येथून दुचाकीवरून घरी चाललेल्या व्यक्तीला थांबवून एका तृतीयपंथीयाने त्यांचा मोबाइल आणि खिशातील एक हजार रुपये हिसकावून नेल्याचा प्रकार रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी कासेवाडी (भवानी पेठ) येथे राहणाऱ्या एका ४८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी तृतीयपंथीयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील बऱ्याच सिग्नलला तृतीयपंथीय वाहनचालकांकडून पैसे वसूल करीत असल्याचे चित्र आहे.

  Post a Comment

  0 Comments
  * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

  Ads Area