पुणे : बनावट नोटा बाळगून लाखो रुपयांची फसवणूक

चलनातून बाद झालेल्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कमिशन देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

नवाब अली उर्फ अलिम गुलाबखान शेख (रा. विश्रांतवाडी) असे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका आरोपीला यापूर्वी अटक करण्यात आली आहे. याबाबत ५७ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती. ही घटना ३० एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी पाच वाजता खडकी परिसरात घडली.


आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या घरी व गाडीमध्ये बंद झालेल्या एक हजार रुपयांच्या एकूण ५६ नोटा, तसेच जुन्या एक हजार रुपयांच्या व पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्या होत्या. या नोटा बदलण्यासाठी दोन हजार रुपये मूल्याच्या खऱ्या नोटा आणल्यास, त्या बदल्यात मोठा आर्थिक फायदा मिळवून देतो, असे अमिष दाखवून आरोपींनी तक्रारदाराकडून चार लाख रुपये उकळले होते.

या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी आरोपी शेख याने न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाला सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. अर्जदार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध बनावट नोटा बाळगून फसवणूक केल्याचा गुन्हा विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्याच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, तसेच त्याने पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तांचा तपास करायचा आहे. अर्जदार हा जामीनावर असतानाही त्याने तशाच स्वरूपाचा गुन्हा केला आहे. त्याला अटक झाली नाही, तर तो फरारी होण्याची व पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील अगरवाल यांनी केला.

अशी केली फसवणूक...

नवाब अली हा अनिवासी भारतीय असून, त्याच्याकडे चलनातून बंद झालेल्या एक हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात सुमारे ९५० कोटी रुपयांची रक्कम आहे, असा दावा आरोपी करीत होते. ही रक्कम भारतीय रिझर्व्ह बँक बदलून देणार असल्याची बतावणी ते करायचे. बनावट नोटांचे व्हिडिओ चित्रीकरण ते लोकांना दाखवत होते. या नोटांच्या बदल्यात दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्यास ३० ते ३५ टक्के कमिशन देण्याचे आमिष ते दाखवत होते. गेल्या वर्षभरात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील बँकर, एजंटांची त्यांनी फसवणूक केली. शेख हा टोळीचा मुख्य सूत्रधार असून, तो नवनवीन साथीदारांना असे प्रकारे गुन्हे करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे, अशी माहिती सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी न्यायालयात दिली.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Ads Area