'त्या' गोळीबाराचा सूड घेण्यासाठी दिली हत्येची सुपारी; माजी नगरसेवक विवेक यादवला अटक

 

स्वतःवर झालेल्या गोळीबाराचा सूड घेण्यासाठी आरोपीच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी फरारी असलेल्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलिसांनी बुधवारी रात्री गुजरात-राजस्थान सीमेवरून ही अटक केली.

कँटोन्मेंट कोर्टाने त्याला २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चेतन जगताप यांनी हा आदेश दिला.
विवेक यादव (वय ३८, रा. वानवडी) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. या प्रकरणात राजन जॉनी राजमनी (३८, रा. कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख (२७, रा. वाकड) या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, या तिघांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबलू गवळीने पूर्ववैमनस्यातून विवेक यादववर २०१६मध्ये गणेशोत्सवादरम्यान गोळीबार करून गंभीर जखमी केले होते. त्याचा सूड घेण्यासाठी यादवने सराईत गुन्हेगार राजन राजमनी आणि इब्राहिम या दोघांना प्रत्यक्ष भेटून आणि व्हॉट्सअॅप कॉल, चॅटिंगद्वारे गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती. पोलिसांनी हा कट उधळून लावून राजन व इब्राहिमला अटक केली. त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तुले, सात जिवंत काडतुसे व एक लाख २० हजार रुपये रक्कम आढळली होती, असे फिर्यादीत नमूद आहे.

नाकाबंदी करून केले जेरबंद

- गुन्हा दाखल झाल्यापासून विवेक यादव फरारी झाला होता.

- तो गुजरातमधील अहमदाबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यावर कोंढवा पोलिसांच्या पथकाने गुजरात गाठले.

- यादव गुजरातमधून राजस्थानमध्ये जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुजरात-राजस्थान सीमेवरील बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथे नाकाबंदी करून यादवला जेरबंद करून पुण्यात आणले.

मोबाइल चॅट केले डिलिट

विवेक यादवला गुरुवारी कँटोन्मेंट कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता. यादवने बबलू गवळीची हत्या करण्यासाठी राजन राजमनीला पुरविलेली तीन पिस्तुले व सात जिवंत काडतुसे कोठून आणली, याचा तपास करायचा आहे, हत्यारे आणि सुपारीची तीन लाख रुपये रक्कम पोहोचवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अटक करायची आहे, आरोपीकडून दोन मोबाइल जप्त केले असून, त्यात सीमकार्ड सापडलेले नाही, तेही जप्त करायचे आहे; तसेच आरोपीच्या मोबाइलमधील राजमनीसोबतचे चॅट डिलिट केले आहे, त्याबाबत तपास करण्यासाठी विवेक यादवला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area