पुणे : वृद्धांना गुंगीचे औषध देऊन सोने लुटणाऱ्या झारखंडच्या महिलेला अटक

 


पुणे : ज्येष्ठ महिलांना पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या झारखंडच्या एका कुविख्यात महिलेला पुणे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली. या महिलेने राज्यासह देशभरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी उच्छाद मांडला होता.
पिंकी परियाल (वय ३४) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवस्तीत फुटपाथवर बसलेल्या एका ७२ वर्षीय महिलेला महिन्याला दोन हजार रुपये मिळवून देण्याचे आमिष दाखवून, आरोपी महिलेने रिक्षातून स्वारगेट भागात नेले होते. तेथे संबंधित महिलेने त्यांना खाण्याच्या पदार्थात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर आरोपी महिलेने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची साखळी आणि रोकड असा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी तपास करताना फरासखाना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात आरोपी महिला दिसली. ती महिला गुन्हेगार असून, तिच्यावर सांगली आणि शिर्डीतही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पोलिस अंमलदार मेहबूब मोकाशी यांना मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात सापळा रचून तिला पकडले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार तिला अटक करण्यात आली आहे.

अशी होती चोरीची पद्धत...

देव दर्शनासाठी मंदिरात आलेल्या एकट्या वृद्ध महिलांना हेरून, आरोपी महिला त्यांच्यासोबत गप्पा मारत असे. त्यांना आमिष दाखवून दुसऱ्या ठिकाणी नेऊन पेढ्यात गुंगीचे औषध घालून देत असे. वृद्ध महिला बेशुद्ध होताच त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरून नेत असे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area