पुणे : वडिलांना कामाच्या ठिकाणी त्रास देणाऱ्या व्यक्तीचे अपहरण केले अन्...

 

पुणे : कामाच्या ठिकाणी वडिलांसोबत वाद घालणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करून त्याला नदीपात्रातील निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी धर्मेश चंद्रमा चौहान (वय २७) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शैलेश मोरे, संतोष त्रिंबक जोगदंड आणि त्यांच्या पाच साथीदारांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला एकाला अटक केली आहे.फिर्यादी तरुण आणि आरोपी शैलेश मोरे याचे वडील सुनील मोरे एकाच कंपनीत कामाला आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे वडिलांशी भांडण केल्याच्या रागातून शैलेश मोरे आणि त्याच्या साथीदारांनी धर्मेशला जबरदस्ती दुचाकीवर बसवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी त्याला वडगावशेरी येथे नदीपात्राच्या कडेला एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी आरोपींनी आणखी तीन साथीदारांना बोलावले आणि फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही त्यांनी धर्मेशला दिली. त्यानंतर फिर्यादीला परत आणून सोडले. त्यानंतर आरोपीने मदतीसाठी चंदननगर पोलिसांत धाव घेतली. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून एकाला अटक केली. मात्र, मुख्य आरोपी शैलेश मोरे आणि इतर फरारी आहेत. चंदननगर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

इमारतीवरून पडल्याने मजुराचा मृत्यू

कोंढव्यातील एका बांधकाम साइटवर काम करताना पाचव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

नीलकमल गुरुगोपाल चक्रवर्ती (वय ४३, रा. मूळ. पश्चिम बंगाल) असे मृत कामगाराचे नाव आहे.

या प्रकरणी आनंदा घोष (वय २९) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून मनीलाल गोविंद राठोड आणि अजय सत्यनाथ मिस्त्री यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेले कामगार हे फिर्यादीचे सासरे होते. ते येवलेवाडीतील बांधकाम साइटवर सेंट्रींगची काम करत होते. या कामाचा ठेका राठोड आणि मिस्त्री यांनी घेतलेला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी निलकमल पाचव्या मजल्यावर काम करत असताना, पाचव्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी घटनेची नोंद केली होती. मात्र, चौकशीमध्ये ठेकेदाराने मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना केल्या नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अल्पवयीन मुलीवर बलात्कार


लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातून संबंधित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून २५ वर्षीय तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीसोबत प्रेमाचे नाटक करून, तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच, तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. उत्तमनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area