पुणे : खर्चासाठी पैसे न दिल्याने खुनाचा प्रयत्न; एका आरोपीला अटक

पुणे: खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी मिळून दोघांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने डोक्यात वार केल्याचा प्रकार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, कोर्टाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

शुभम रामभाऊ टिकोळे (वय २५, रा. कोंढवा खुर्द) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आकाश उणेचा व अन्य दोघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश महादेव घुगे (वय २१, रा. कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना शनिवारी (२४ जुलै) रात्री बाराच्या सुमारास कोंढव्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे घडली.


आकाश उणेचा याने तक्रारदाराचा मित्र संतोष परदेशी याच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले होते. संतोषने आरोपीला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा आरोपीला राग आला. त्यातून आरोपींनी संतोषला शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्यांनी मारहाण केली. त्या वेळी तक्रारदार भांडणे सोडविण्यासाठी गेले. आरोपी आकाशने धारदार हत्याराने तक्रारदाराला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात वार केला. तक्रारदाराचा मित्र संतोष यालादेखील जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात वार करून जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी टिकोळेला कोर्टात हजर करण्यात आले. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी; तसेच गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. कोर्टाने ती मान्य केली.

मेव्हणीला मारहाण; 'बंडगार्डन'ला गुन्हा दाखल

'माझ्या पसंतीच्या मुलासोबत लग्न कर,' असे म्हणून एका व्यक्तीने मेव्हणीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार ताडीवाला रस्ता येथे घडला. या प्रकरणी २८ वर्षीय पीडित तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून दिनेश शांताराम नहारिया (वय ४२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेव्हणीने स्वत:च्या पसंतीच्या मुलालाच होकार द्यावा, या आग्रहातून आरोपीने पत्नीच्या बहिणीला बेदम मारहाण केली. त्या वेळी आरोपीची पत्नी तिला सोडविण्यासाठी आली असता, आरोपीने पत्नीलादेखील मारहाण केली.

    Post a Comment

    0 Comments
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    Ads Area