दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

 

मुंबई : भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन तंबूत परतले… 193 धावांवर सात विकेट्स… अजूनही जिंकण्यााठी 83 धावांची गरज… हातात फक्त 3 विकेट्स… मैदानावर धोनीचा आवडता खेळाडू दीपक चहर (Deepak Chahar) आणि श्रीलंकन दौऱ्यासाठी असलेला उपकर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar)…. या अशा सगळ्या परिस्थितीत दीपकने खेळलेली मॅचविनिंग खेळी कौतुकास्पदच नाही तर विश्वासावर ‘विश्वास’ ठेवायला शिकवते. कितीही वाईट परिस्थिती आली तरी संयम ठेवायला शिकवते. पण त्याच वेळी आयुष्यात कुणीतरी एक व्यक्ती खंबीर पाठीशी असावा लागतो जो कठीण प्रसंगात दिशा दाखवतो… चहरने भारताच्या माथी विजयी टिळा लावला खरा पण त्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविडचा तो एक मेसेज कारणीभूत ठरल्याचं खुद्द चहलने मॅच संपल्यानंतर सांगितलं.


राहुल द्रविडचा तो मेसेज काय होता…?

श्रीलंकेने भारतीय संघाला विजयासाठी 276 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ढेपाळला. पहिल्या फळीतील आणि मधल्या फळीतील खेळाडू लवकर तंबूत परतले. अपवाद सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केली. पांड्याने 35 धावा केल्या. मात्र श्रीलंकन गोलंदाजांनी मॅचमध्ये पुनरागमन करत एक एक विकेट्स घेत भारताची अवस्था 193 धावांवर सात बाद, अशी केली…. अशा वेळी मैदानात चहर-भुवीची जोडी होती… या जोडीने संयम शब्दाचा खरा अर्थ काय असतो, हे दाखवून दिलं. ही जोडी विजयाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत होती. या साऱ्यात राहुल द्रविडने नेमक्या क्षणी चहरसाठी एक मेसेज पाठवला.“तुला शेवटपर्यंत खेळायचंय. सगळे बॉल खेळून काढ…”, असा मेसेज राहुल द्रविडने चहरसाठी पाठवला. साहजिक द्रविडचा तो मेसेज चहरने सामन्याच्या शेवटपर्यंत लक्षात ठेवला. कोणतीही घाई गडबड न करता चहर खेळपट्टीवर शेवटपर्यंत उभा राहिला. परिणामी भारताने अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली.


सामन्याचा लेखाजोखा

श्रीलंकन फलंदाजांनी भारताला 276 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची आज खराब सुरुवात झाली. आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ (12) तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ इशान किशन (1), शिखर धवन (29), मनिष पांडे (37) हार्दिक पंड्या (0) एका मागोमाग एक ठराविक अंतराने बाद होत गेले. परंतु सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरली होती. त्याने 42 चेंडूत 52 धावा फटकावत एकदिवसीय कारकीर्दीतलं पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर आलेल्या कृणाल पंड्याने 35 धावांचं योगदान दिलं. कृणाल बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र दीपक चाहरने हाती घेतली.

सुरुवातीला संयमी खेळी करत त्याने डावाला आकार दिला. त्यानंतर गरज पडेल तेव्हा फटकेबाजी करत 82 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार फटकावला. भुवनेश्वर कुमारने (19) त्याला अखेरपर्यंत चांगली साथ दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area