बंगला फोडून चोरी; वृद्ध महिलेचा खून करून सोन्याचे दागिने लुटले!

 

सांगली : तालुक्यातील धामणी येथे गुरुवारी रात्री चोरट्याने बंगला फोडून चोरी केली. यामध्ये शालुबाई पांडुरंग पाटील (वय ८०) या वृद्धेचा खून करून तिच्या अंगावरील तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवण्यात आले आहेत. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मुलगा सुभाष पांडुरंग पाटील यांनी सांगितले की, ते पत्नी आणि मुलांसह धामणी येथे राहतात. त्यांना रमेश पाटील व शहाजी पाटील असे दोन भाऊ आहेत. ते गलाई व्यावसायिक असून तामिळनाडू राज्यात आहेत. त्यांच्या बंगल्यात आई एकटीच राहते.

बुधवारी ते पत्नीसह शेतात गेले होते. यावेळी आईचा भाचा महेश कुलकर्णी हा येऊन त्याने आईला गावातील त्याच्या घरी घेऊन गेला. दिवसभर ती त्याच्याच घरी होती. सायंकाळी पाच वाजता त्याने तिला घरी आणून सोडले व निघून गेला. यावेळी ती आमच्या घरी चहा पिऊन गेली.

गुरुवारी सकाळी आठ वाजता शहाजी यांच्या बंगल्यातील गाडी आणण्यासाठी मी गेलो. यावेळी घराच्या कंपाऊंड गेटला आतून कुलूप घातले होते. यावेळी मी व मुलगा तेजस यांनी आईला हाका मारल्या, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तेजस याने पहिल्या मजल्यावर जात घराची कडी काढली. तेव्हा बेडरूममध्ये आई मृत अवस्थेत दिसली. तिचे तोंड व गळा कापडाने बांधून खून करण्यात आला होता. तसंच तिच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, दोन चेन, चार अंगठ्या, मोहनमाळ, कर्णफुले असे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गायब होते. तसेच खोलीतील साहित्य विस्कटलेले होते.

दरम्यान, या घटनेनंतर पाटील कुटुंबाने मोठा आक्रोश केला. तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area